
Oplus_131072
नवी दिल्ली:सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून या मूर्तीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मूर्तीच्या डोळ्यांची पट्टी काढून हातात तलवारीच्या जागी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे.
भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी हे बदल केले आहेत. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवून न्यायदेवता (कायदा) अंध नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच कायदा व्यवस्था भारतीय संविधानावर आधारित असल्याचे दाखवण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवारीच्या जागी भारतीय संविधान दाखवण्यात आले आहे.
न्यायमूर्तीच्या वाचनालयात नव्या पुतळ्याचे अनावरण-
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या वाचनालयात नवा पुतळा बसवण्यात आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी स्वतः हा पुतळा बनवण्याचे आदेश दिले होते.
पूर्वीच्या पुतळ्यात डोळ्यावर पट्टी बांधण्याचा अर्थ होता की कायदा सर्वांना समान वागणूक देतो. हातातल्या तलवारीने हे दाखवून दिले की कायद्यात शक्ती आहे आणि तो अन्याय करणाऱ्यांना शिक्षा देऊ शकतो. मात्र, नव्या पुतळ्यात एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे तराजू. पुतळ्याच्या एका हातात तराजू तसाच ठेवण्यात आला आहे.