नागपूर\नवी दिल्ली : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गटात सत्तासंघर्ष पेटला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांन नोटीस बजावली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राहुल नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात या नोटीशीचे उत्तर द्या, असा सूचनाही न्यायालयाने दिल्या.
गेल्या अडीच महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यासंदर्भात जाणून बुजून उशीर करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती.
यावर आज ( १४ जुलै ) सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. “दोन आठवड्यांत विधानसभा अध्यक्षांनी आपले उत्तर सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात येत आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटले.