मुंबई: आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौ-याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर आणि परिसरातील काँग्रेस नेते आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच एनएसयुआय आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून शिंदे यांनी मारहाण करणा-या मस्तवाल पोलीस अधिका-यांना तात्काळ निलंबत करण्याची मागणी केली.
मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनआक्रोश वाढत चालल्यानेच विरोधकांचे तोंड बंद करण्याकरिता सरकार पोलीस अंगावर सोडत आहे. परंतु लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कायदा हातात घेणा-या पोलिसांनी सत्ता येत जात असते याची जाणिव ठेवावी असे शिंदे म्हणाले. सोलापूरला आणिबाणी सदृश्य परिस्थिती आणली गेली हे मोदी हुकुमशाही मानसिकतेचे असल्याचे निदर्शक आहे. सीबीआय संचालकांच्या मध्यरात्री केलेल्या उचलबांगडीतून व कुणाशीही सल्लामसलत न करता जाहीर केलेल्या नोटबंदीसारख्या निर्णयातून ते आधीच दिसून आलेले आहे.
ते पुढे म्हणाले की, सोलापूरमध्ये येऊन आपल्या अनेक योजनांची भलामण करत आपण फार महान कार्य करत आहोत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पंतप्रधानांनी केला. यासोबतच त्यांनी त्यांच्या खास उद्योगपती मित्रांसाठी सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री देश लुटो और भाग जाओ’ योजना जिचे लाभार्थी निरव मोदी, हमारे मेहुल भाई, विजय माल्ल्या, ललित मोदी आहेत याबद्दलही जनतेला माहिती द्यायला हवी होती. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पंतप्रधान स्वतःला चौकीदार म्हणत होते. त्यामुळे भ्रष्टाचा-यांना चौकीदाराचे संरक्षण असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सोलापूरला जाहीर केलेल्या योजना ह्या काँग्रेस सरकारच्या काळातील असून त्याला बहुतांश तरतूद ही काँग्रेस सरकारच्या काळातील आहे.
विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी गेल्या काही महिन्यात अनेक वेळा राज्यात आलेल्या पंतप्रधानांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत करण्याबाबत चकार शब्द काढला नाही. राज्यात सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील एकाही शेतक-याच्या घरी जायला पंतप्रधानांना वेळ मिळाला नाही. निवडणुकीत दिलेल्या किती आश्वासनांची पूर्तता केली ते ही मोदींनी जनतेला सांगितले असते तर बरे झाले असते. निवडणुका जवळ आल्याने पंतप्रधान मोदी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध प्रकल्पांच्या घोषणा आणि भूमीपूजने करत आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांचे साधे टेंडरही निघालेले नाही. मोदी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून ९० दिवसानंतर देशात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेसचे येणार आहे.
त्यामुळे हे सर्व प्रकल्प नविन सरकारच्या कार्यकाळातच पूर्ण होणार आहेत त्यामुळे मोदींनी आता भूमीपूजने करून लोकांची फसवणूक करण्याची हौस भागवून घ्यावी. ‘बाजारात विकासाच्या तुरी आणि मोदीजी पोकळ बाता मारी!’ अशा शेलक्या शब्दात शिंदे यांनी पंतप्रधानांच्या खोटारडेपणाचा समाचार घेतला.
सदर पत्रकार परिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील उपस्थित होते.