नागपूर: पुणे जिल्हयातील निगडे येथील जिल्हापरिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचा निकृष्ट दर्जाचा पाझर तलाव फुटून मोठयाप्रमाणात शेतीचे नुकसान झाले. असा निकृष्ट दर्जाचा पाझर तलाव बांधणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकून जे अधिकारी या घटनेशी संबंधित आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आमदार संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्हयातील निगडे पाझर तलाव फुटल्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्दयावर चर्चेत सहभाग घेत विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मागणी केली. पाझर तलाव फुटल्यामुळे सुमारे ७५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात पिकांचे व शेतीचे सुमारे १० कोटींचे नुकसान झाले आहे.
दरम्यान विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मागणी केल्यानंतर संबंधित शाखा अभियंता आणि उपअभियंता यांना निलंबित करण्यात आले असून ठेकेदाराला काळया यादीमध्ये टाकण्याची घोषणा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी सभागृहामध्ये केली.