Published On : Wed, Dec 5th, 2018

नागपुरात निलंबित शिपायाचा डीसीपीच्या बंगल्यावर गोंधळ

नागपूर : निलंबित केल्यामुळे दुखावलेल्या एका पोलीस शिपायाने झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या बंगल्यावर गोंधळ घातला. दारू पिऊन असलेल्या या शिपायाने बंगल्यात प्रवेश करून शिविगाळ केली. बंगल्यावर तैनात असलेल्या शिपायालाही शिविगाळ करीत दारूची बाटली फोडून हल्लाही केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने शहर पोलीस विभाग हादरले आहे.

प्रदीप चौधरी असे आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. प्रदीप पूर्वी पोद्दार यांच्या बंगल्यावर तैनात होता. असे सांगितले जाते की, त्याला दारूचे व्यसन आहे. यापूर्वीही त्याचे एका डीसीपीच्या बंगल्यावर तैनाती दरम्यान वाद झाला होता. दीड महिन्यांपूर्वी त्याने पोद्दार यांच्या बंगल्यावर तैनात असताना वाद घातला होता. त्याने काम करण्यास नकार दिला होता. यामुळे त्याला ३० आॅक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले होते. तेव्हापासून प्रदीप अतिशय दुखावलेला होता.

Gold Rate
Friday 31 Jan. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मंगळवारी रात्री ९ वाजता प्रदीप लॉ कॉलेजजवळील पोद्दार यांच्या शासकीय बंगल्यावर आला. त्याने बंगल्यासमोर आपली बाईक उभी केली. दारूची बॉटल घेऊन तो बंगल्यात शिरला. तिथे शिपाई सागर आत्राम हे फोन ड्युटीवर तैनात होते. प्रदीप सागर यांना शिविगाळ करीत धमकावू लागला. त्याने बंगल्यासमोर दारूची बॉटल फोडून सागरला फेकून मारली आणि बाईकवर स्वार होऊन फरार झाला. सागरने या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

निलंबित शिपायाद्वारे डीसीपीच्या बंगल्यात गोंधळ घातल्याने पोलीसही हादरले. झोन पाचच्या पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने प्रदीपच्या शोधात पाठवण्यात आले. तो वाडीत राहत होता. पोलीस रात्री उशिरा त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तो सापडला. तो नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्याने तिथेही गोंधळ घातला. पोलिसांनी त्याला कसेतरी शांत कले. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, मारहाण करणे आणि धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement