मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मोठा दिलासा दिला आहे. सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली असून त्यांच्यावरील सर्व आरोप वगळले. सिंह यांच्याविरोधात खंडणीचे आठ गुन्हे होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
आता शिंदे सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. मात्र सिंह आता निवृत्त झाले असून त्यांना पुन्हा सेवेत येणार नाहीत. परमबीर सिंह आयुक्त पदावर असतानाच मन्सुख हिरेन प्रकरण गाजले. यात सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप झाले होते. याप्रकरणी वाझे तुरुंगात आहेत.
दरम्यान परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देशमुख यांना जेलमध्ये जावे लागले. आता मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.