नागपूर : उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने बुधवारी/गुरुवारी पीओपी मूर्ती विकणा-यांवर कारवाईची मोहीम राबविली आणि 390 मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली. पथकाने विक्रेत्यांकडील 61 पीओपी मूर्ती जप्त करुन 1 लक्ष 66 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
प्रशासक तथा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या आदेशानुसार पीओपी मूर्तीची विक्री करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाई करण्याची जबाबदारी झोन कर्मचारी व एनडीएस पथकांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून पथकांनी शहराच्या विविध भागातील मूर्ती विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली.
प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.01) 06 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली आणि गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 11 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत शंकर नगर येथील सुर्या एजन्सी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत कॉटन मार्केट येथील गुरुनानक स्टेशनरी या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच गांधीबाग झोन अंतर्गत पातालेश्वर मंदीर येथील माहाविर ट्रेडर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत क्रीडा चौक, हनुमाननगर येथील ओजस हेल्थकेअर यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत बायो-मेडिकल-वेस्ट कचरा ठेवल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्र नगर चौक येथील ब्लु रॅबीट पथ लॅब यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत बायो-मेडिकल-वेस्ट कचरा ठेवल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.