नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. 13) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच 7 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धरमपेठ झोन अंतर्गत सीताबर्डी यशवंत स्टेडियम जवळील गणेश सागर रेस्टॉरेन्ट यांच्याविरूध्द कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत बडकस चौक महाल येथील गुरुगोविंद सिंग रेडिमेड तसेच नंगापुतला चौक, गांधीबाग येथील गुरुगोविंद सिंग या दुकानांविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत बिनाकी मंगलवारी येथील जी.के.ट्रेडिंग या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत श्री गणेश अपार्टमेन्ट, कोतवाल नगर येथील Ojas Luxurious यांच्याविरूध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
खालील प्लास्टिक वस्तुंवर बंदी
केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या निर्देशानुसार ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारचे प्लास्टिक प्रतिबंधीत करण्यात आले आहे. कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणा-या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लास्टिकसह पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), डिश बाउल, कंटेनर (डबे) आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे. याशिवाय सजावटीसाठीचे प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), प्लास्टिकचे आवरण असलेले मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे यावर सुद्धा बंदी असेल. यासोबतच प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणा-या प्लास्टिक कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, आईसक्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी – जसे : काटे चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे इ. आणि १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर हे सर्व प्रतिबंधित करण्यात आले आहे.