नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.26) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात नेहरुनगर, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल नेहरुनगर झोन अंतर्गत उमरेड रोड, दिघोरी येथील श्री तुलीराम पवार यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत जुना बगडगंज येथील विनायक किराणा स्टोअर्स यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत तांडापेठ, इतवारी येथील बिनेकर अगरबत्ती कारखाना यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत एस.टी.बस स्टँड, गणेशपेठ येथील हॉटेल व्दारकामाई यांच्याविरुध्द ओला व सुका कचरा वेगळा केला नाही आणि अस्वच्छ स्वयंपाकघर आढळल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत किंगवे रोड, सि.ए.रोड येथील किम्स किंगवे हॉस्पीटल यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा सापडल्याबद्दल कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.