नागपूर,: भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्त नागपूर महानगरपालिका (समाज विकास विभाग), दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवा अंतर्गत शुक्रवारी 29 जुलै रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे पथविक्रेत्यांचे प्रदर्शन आणि फुड स्टॉलचे आमदार श्री. मोहन मते यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी मनपाचे अति.आयुक्त श्री. दीपककुमार मीना, उपायुक्त श्री. विजय हुमने, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, गृह निर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे नॅशनल मिशन मॅनेजर श्री. विजय सिंह, सहाय्यक आयुक्त श्री. हरीश राऊत व समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार मते यांनी विविध बचत गटांच्या फूड कोर्ट, हस्तकला व वस्त्रांच्या आणि बँकेच्या स्टॉल्सची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमात आरबीआयच्या सहायक व्यवस्थापक सौ. तनुश्री गुप्ता यांनी क्युआर कोड आणि डिजिटल पेयमेन्टसची माहिती पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन द्वारे उपस्थित बचत गटाच्या सदस्यांना दिली. त्यानंतर आरबीआयच्या सहायक व्यवस्थापक सौ. पौर्णिमा नांबियार यांनी वित्तीय साक्षरता आणि समावेशन यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर समाजकल्याण विभागाचे श्री. किशोर भोयर यांनीही पथविक्रेते आणि बचत गटांसाठी उपयुक्त शासकीय योजनांची माहिती यावेळी दिली.
त्यानंतर नागपूर विभागाचे नोडल अधिकारी व कृषी संचालक श्री. अरविंद उपरीकर यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून शेतकरी व पथविक्रेते यांच्यासाठी अनेक उपयुक्त योजनांची माहिती दिली. विशेषतः बागायती (फळे) पिके त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने त्यांसंदर्भातील शासनाच्या कर्ज आदीविषयक योजना त्यांनी उपस्थितांना सांगितल्या. यावेळी मंचावर स्वनिधी योजनेचे प्रतिनिधी ऋचा तावकर आणि विजय लाहोटी उपस्थित होते.
पथ विक्रेत्यांसाठी आयोजित पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले क्लिनिकल डाएटिशियन आणि न्यूट्रिशियनिस्ट डॉ. सोनाली कोलते, फूड ब्लॉगर विजय जथे, सुजाता नागपुरे, सुचित्रा सहस्त्रभोजानी, स्वाती गुप्ता यांनी फूड कोर्टमधील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला आणि पदार्थांची पाककला जाणून घेतली तसेच पदार्थविक्रेत्या स्टॉलधारकांना स्वच्छता आणि अन्य बाबींसंदर्भात महत्वाच्या टिप्स दिल्या.
त्यानंतर पीएम स्वनिधी योजनेबाबत तिरपुडे महाविद्यालयाच्या विद्यार्थी चमू द्वारे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर प्रश्नमंजुषा, नृत्य आणि गीत गायन स्पर्धांमध्ये देखील विविध बचत गटाच्या सदस्यांनी सादरीकरण केले. पथ विक्रेत्यांच्या स्टॉल्सला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज विकास विभागाचे व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, रितेश बांते, नुतन मोरे, प्रमोद खोब्रागडे आदींनी सहकार्य केले.