– ‘स्वयम’तर्फे रेल्वे भरती नि:शुल्क मार्गदर्शन कार्यशाळा
नागपूर : भारतीय रेल्वेमध्ये सध्या टेक्निकल आणि नॉन टेक्निकलच्या १ लाख ४२ हजार पदांसाठी मेगाभरती निघाली असून मोठ्या संख्येने विद्यार्थी यासाठी तयारी करीत आहेत. मात्र, केवळ अभ्यास करून चालणार नाही, तर रेल्वे परीक्षेसाठी वेळेचे नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असा मूलमंत्र साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वेचे स्टेशन मास्टर नितीन देशभ्रतार यांनी दिला. स्वयम् सामाजिक संस्था आणि माय करिअर क्लबच्यावतीने रविवारी (ता. १७) मानेवाडा रोडवरील सिद्धेश्वर सभागृहात रेल्वे भरती नि:शुल्क मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात रेल्वे परीक्षा मार्गदर्शक अशोक राऊत, पंकज नरांजे, स्वयम् संस्थेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार उपस्थित होते. देशभ्रतार म्हणाले, अभ्यासासाठी नामांकित प्रकाशनांच्या पुस्तकांची निवड करावी. कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेला उमेदवार रेल्वे परीक्षा देऊ शकतो. यासाठी शालेय जीवनापासूनच गणित, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. अशोक राऊत यांनी ९० मिनिटांत १२० प्रश्न कसे सोडवायचे याच्या टिप्स दिल्या. तसेच कठीण वाटणारे गणित कमी सेकंदांत सोडविण्यासाठी शॉर्टकट ट्रिक्सही सांगितल्या.
रेल्वे परीक्षेसाठी किती अभ्यास करता यापेक्षा अभ्यास कसा करता हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. पंकज नरांजे यांनी रेल्वे परीक्षेतील सामान्य विज्ञान विषयांतर्गत फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी विषयांतील प्रश्न कसे सोडवायचे याविषयी मार्गदर्शन केले. रेल्वे परीक्षेतील प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी पदानुसार कोणता सिलॅबस ठरविण्यात आला आहे, हे जाणूनच अभ्यास करावा. रेल्वे परीक्षेत भूगोल आणि इतिहास विषयांवर क्वचितच प्रश्न विचारले जातात. अशावेळी या विषयांचा अभ्यास करण्यावर वेळ गमावू नये, असा सल्ला नरांजे यांनी दिला. केवळ ठराविक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता रेल्वे, बँकिंग, एसएससी, यूपीएससी, एमपीएससी या परीक्षांमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यश मिळवावे, असे आवाहन विशाल मुत्तेमवार यांनी केले. संचालन अमोल ठाकरे यांनी केले, तर जीवन आंबुडारे यांनी आभार मानले. कार्यशाळेसाठी प्रकाश भोयर, मोहन गवळी, नम्रता धोंगडे, पायल भेंडे यांनी सहकार्य केले.