नागपूर : ख्रिसमस, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारीसाठी पर्यटकांची गर्दी उसळी आहे.यानिमित्ताने सफारीचे बुकिंग हाऊसफुल्ल आहे. वाघांसाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प देशातूनच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो. ताडोबात सुमारे ९७ वाघ आहेत. जे प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.याशिवाय इतर वन्यप्राण्यांची संख्याही लक्षणीय आहे.
बल्लारपूर, चंद्रपूर येथे 26 ते 31 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमुळे चंद्रपुरात देशभरातून सुमारे 3 हजार खेळाडूंचा मेळावा होत आहे. हे पाहता वनविभागाने खेळाडूंना मोफत पर्यटन उपलब्ध करून देण्याची योजना आखली असून, त्यादृष्टीने ताडोबातील सर्व 5 क्रूझर वाहने, 4 कॅंटर आणि 2 बस खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सकाळ व दुपारच्या सफारीमध्ये ताडोबा पर्यटनाचे आयोजन करण्यात येत आहे ही सर्व वाहने आरक्षित झाल्याने पर्यटकांसाठी जिप्सी वाहन हाच पर्याय उरला असून, ते जवळपास पूर्ण हाऊसफुल्ल झाले आहेत.
यंदा २०२३ मध्ये आतापर्यंत दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी सफारी केली आहे. यामध्ये व्हीआयपींचाही समावेश आहे. ताडोबा प्रशासनाला पर्यटनातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे , हे विशेष.