माजी महापौर संदीप जोशी यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
नागपूर : कोरोनाबाधित रुग्णाकडून आगावू रक्कम (डिपॉझिट) घेउ नये असे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे आदेश असतानाही नागपूर शहरातील काही रुग्णालय रुग्णांना भरती करण्यापूर्वी लाखो रूपये डिपॉझिट घेत असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधी पुरावे सुद्धा उपलब्ध असून अशा रुग्णालयांवर तातडीने कठोर कारवाई करून अशाप्रकारचे कार्य करणा-या इतर रुग्णालयांना सुद्धा तंबी द्यावी, अशी मागणी माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांना निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना रुग्णांची लुबाडणूक होऊ नये यासाठी शासनाचे कडक नियम आणि दिशानिर्देश असताना नागपुरात मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असल्याचे लक्षात येताच माजी महापौर संदीप जोशी यांनी या संदर्भात तक्रार करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून त्यातून काही रुग्णालयांचा प्रताप पुढे येत आहे. नुकतेच एका व्यक्तीच्या तक्रारीवरून संदीप जोशी यांनी दखल घेत मनपा आयुक्तांना कारवाई संदर्भात निवेदन दिले आहे.
१८ एप्रिल रोजी रामदासपेठ येथील आयुष्यमान हॉस्पिटल येथे तुषार ठावरे या रुग्णाला भरती करण्याबाबत हॉस्पिटल प्रशासनामार्फत ३ लाख रुपये डिपॉझिट भरण्याची अट ठेवण्यात आली. पैसे न भरल्यास रुग्णाला दाखल करून घेतले जाणार नसल्याचे रुग्णालयाद्वारे स्पष्ट सांगण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी पैसे भरल्यानंतर एका साध्या कागदावर रुग्णालयाचा शिक्का मारून त्याची रसिद हॉस्पिटलद्वारे देण्यात आली. कोरोनाच्या या संकटामध्ये अनेक हॉस्पिटल, तेथील डॉक्टर व वैद्यकीय चमू अविरतपणे सेवा देत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र या संकटात अनेक जण संधी शोधून रुग्णांकडून अशी लुबाडणूक करीत असल्याचे अनेक प्रकार पुढे येत आहेत. हा सर्व प्रकार मनपाद्वारे नियुक्त ऑडिटरच्या मिलीभगतमुळेच होत असतो. त्यामुळे नागरिकांची अशी लुबाडणूक करणा-या हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे माजी महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज पडल्यानंतर नागरिक धावपळ करीत बेड उपलब्ध असेल त्या हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. रुग्णाच्या नातेवाईकाच्या या स्थितीचा काही रुग्णालय फायदा घेत त्यांची लुबाडणूक करतात.
शासनाचे स्पष्ट निर्देश असतानाही, ८० टक्के शासकीय दराने आणि २० टक्के व्यवस्थापनाच्या दराने खासगी रुग्णालयात नियोजन होत नाही. रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज असल्यास नातेवाईक घाबरलेल्या अवस्थेत बेड उपलब्ध असेल त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला दाखल करून घेतात. या स्थितीचा काही रुग्णालय फायदा घेत २० टक्के व्यवस्थापनाच्या दरानेच तो रुग्ण दाखल करून त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांची स्वाक्षरी करून घेतात. व पुढे आक्षेप घेतल्यास आपण मान्य असल्याची स्वाक्षरी केल्याचे दाखवतात. त्यामुळे रुग्णाला दाखल करताना अर्जावर सही करण्यापूर्वी आपला रुग्ण शासनाच्या ८० टक्के दराने भरती केला आहे की व्यवस्थापनाच्या २० टक्के दराने ते तपासून घ्यावे, असेही आवाहन माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.