नागपूर: अंबाझरी तलावामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढत आहेत. यावर आळा घालण्याच्या दृष्टीने तलावात होणारे प्रदूषण रोखण्याची गरज असून त्यादृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) वर कार्यवाही करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.
अंबाझरी तलावातील जलपर्णीच्या उगमाचे कारण शोधून ती समूळ नष्ट करण्याच्या संदर्भात मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये मनपा, वाडी नगरपरिषद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीमध्ये मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, वाडी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय देशमुख, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. प्रकाश वराडे व श्री संदीप लोखंडे उपस्थित होते. बैठकीला अनुपस्थितीत राहिल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्तांनी मनपा अधिका-यांना दिले.
यावेळी आयुक्तांनी उपस्थित विभागांचा आढावा घेतला. वाडी नगरपरिषद हद्दीतील नाला अंबाझरी तलावाला जुळलेला आहे. या नाल्यावर परमाणू उर्जा केंद्राजवळ ११ एमएलडीचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनातर्फे १०५ कोटी मंजूर झाले असून या प्रकल्पामुळे तलावामध्ये होणारे प्रदूषण नियंत्रणात येण्यात मदत होणार असल्याची माहिती वाडी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजय देशमुख यांनी बैठकीत दिली. प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ असल्यामुळे नाल्यातून तलावात विसर्ग होणा-या पाण्यावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना होणे आवश्यक असल्याची गरज मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केली. तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात ‘नीरी’चा सल्ला घेण्याचे देखील निर्देश आयुक्तांनी दिले.
वाडी नगरपरिषद हद्दीतील नाला आणि एमआयडीसी येथून येणारे पाणी अंबाझरी तलावामध्ये विसर्ग होणा-या स्थळाची संबंधित अधिकारी व ‘नीरी’च्या तज्ज्ञांसोबत स्वत: प्रत्यक्ष पाहणी करण्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी यावेळी दिली. उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी तलावामध्ये पाण्याचा विसर्ग होणा-या स्थळांची माहिती बैठकीमध्ये सादर केली.