महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांचे निर्देश
नागपूर,: कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे महिला उद्योजिका मेळावा गतवर्षी रद्द करण्यात आला. कोव्हिड संदर्भातील नियमांचे पालन करून झोनस्तरावर मेळाव्याचे आयोजन केल्यास झोनमधील महिला बचत गट तसेच अन्य महिलांना त्याचा लाभ घेता येईल. यादृष्टीने झोनस्तरावर महिला उद्योजिका मेळाव्याच्या आयोजनासंबंधी कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी दिले.
विविध विषयांच्या अनुषंगाने गुरूवारी (ता.२३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये महिला व बालकल्याण समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती दिव्या धुरडे, उपसभापती अर्चना पाठक, सदस्या प्रणिता शहाणे, मंगला लांजेवार, सोनाली कडू, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दीनकर उमरेडकर, शहर अभियान व्यवस्थापक विनय त्रिकोलवार आदी उपस्थित होते. ऑनलाईन माध्यमातून समिती सदस्या रूपाली ठाकुर, निरंजना पाटील, उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त अशोक पाटील, गणेश राठोड बैठकीमध्ये उपस्थित होते.
झोन स्तरावर महिला उद्योजिका मेळाव्याच्या आयोजनासंबंधी प्रशासनातर्फे सर्व झोनला पत्र देउन त्यासंदर्भात कार्यवाहीचा अभिप्राय मागविण्यात येणार असल्याचे यावेळी उपायुक्त राजेश भगत यांनी समितीला सांगितले.
मनपाच्या दहाही झोनमध्ये ‘पोटोबा’चे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महिला बचत गटांच्या सक्षमीकरिता हा प्रकल्प महत्वाचा असून यासंबंधी समितीद्वारे सर्व झोनमध्ये जागेची पाहणी करण्यात आली आहे. पाहणी करण्यात आलेल्या जागांवर ‘पोटोबा’चे स्टॉल्स लवकरात लवकर सुरू होईल यासंबंधी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण समिती सभापतींनी दिले. मनपा मुख्यालयामध्ये बांबूचे पोटोबा स्टॉल उभारलेले आहे. या स्टॉलची दुरूस्ती करण्यासंदर्भातही कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मनपातर्फे करण्यात आलेलया रस्त्यावर राहणा-या बालकांच्या सर्वेचा यावेळी समिती सभापतींनी आढावा घेतला. खासगी कंपनीच्या माध्यमातून समाजविकास विभागातर्फे २०१७मध्ये शहरातील रस्त्यावर राहणा-या १२१८ बालकांचा सर्वे करण्यात आला. सर्वे करण्यात आलेल्या बालकांना शिक्षण मिळावे, ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नयेत तसेच त्यांच्या आरोग्याच्या समस्या सोडविण्यात याव्यात यादृष्टीने सर्वे करण्यात आलेल्या बालकांची यादी मनपा शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि पोलिसांना देण्यात आली असल्याची माहिती समाजविकास विभागाद्वारे देण्यात आली. केंद्र शासनाद्वारे भिक्षेकरुंकरिता देशात १० शाळा सुरू करण्यात येणार असून त्यात नागपूर शहराचा समावेश आहे. यासंबंधी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेत समिती गठीत असून त्यामाध्यमातून भिक्षेकरूंचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भिक्षेकरूंची निवारा केंद्रामध्ये व्यवस्था करून तिथे त्यांचा संपूर्ण ‘मेकओव्हर’ करणे, त्यांच्यातील कलागुणांना वाव देउन त्यांना रोजगार मिळवून देणे हे सर्व कार्य या योजनेच्या माध्यमातून होणार आहेत. पहिल्या टप्प्यात नागपूर शहरामध्ये एक निवारा केंद्र उभारण्यात येणार असून त्यासाठी शहरात घाट रोड येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. पोलिस विभागाच्या सहकार्याने ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपायुक्त राजेश भगत यांनी दिली.
शहरातील महिलांना प्रशिक्षण देउन त्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या उद्देशाने शहरात प्रशिक्षण वर्ग घेण्यासंदर्भात सूचना बैठकीत महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी केली. राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन अंतर्गत १८ ते ४५ वर्ष वयोगटातील महिलांना प्रशिक्षण देउन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविण्यात येत असल्याची माहिती शहर अभियान व्यवस्थापक विनय त्रिकोलवार यांनी दिली. यासंदर्भात झोनस्तरावर कार्यवाही करण्याबाबत सभापती दिव्या धुरडे यांनी निर्देश दिले.