एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने मनपाच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅन’चे उद्घाटन
नागपूर : नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सोयी देण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. डिजीटल युगात नागरिकांना मालमत्ता करही डिजीटल स्वरूपात भरणे सोयीचे व्हावे, यासाठी मनपाने आता एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने सर्व पेमेंट सेवा ऑनलाईन केल्या आहेत. यासोबतच नागरिकांसाठी दहाही झोनमध्ये प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅन फिरणार आहे. यामाध्यमातून नागरिक रोख किंवा डेबीट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मालमत्ता कराचा भरणा करु शकतात. या लोकाभिमुख सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेने एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने ‘प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅन’ची सेवा नागरिकांसाठी सुरु केली. या सेवेचे उद्घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला उपायुक्त नितीन कापडणीस, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, सहायक आयुक्त (कर व कर आकारणी) मिलिंद मेश्राम, आयटीओ इन्चार्ज स्वप्नील लोखंडे, एचडीएफसी बँकेचे सर्कल हेड विवेक हांडा, क्लस्चर हेड गगनदीप बुधराजा, सदर शाखेचे व्यवस्थापक विक्रम चौहान, सहायक व्यवस्थापक समीर गुप्ता उपस्थित होते.
मालमत्ता कर भरण्यासाठी केलेली ऑनलाईन पेंमेट सेवा आणि प्रापर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅनमुळे नागरिकांना कर भरणे आता अधिक सोयीचे होईल. मनपाच्या कार्यालयात जाऊन रांगेत लागण्यापेक्षा संगणक किंवा स्मार्ट फोनवरून नागरिक सोप्या पद्धतीने कर अदा करू शकतात. यामुळे कर संकलनात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी व्यक्त केला.
महापौर नंदा जिचकार यांनी प्रापर्टी टॅक्स कलेक्शन व्हॅनला झेंडी दाखविली. तत्पूर्वी एचडीएफसी बँकेच्या वतीने शाखा व्यवस्थापक विक्रम चौहान आणि सहायक व्यवस्थापक समीर गुप्ता यांनी महापौर नंदा जिचकार, उपायुक्त नितीन कापडणीस व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाखा व्यवस्थापक विक्रम चौहान यांनी महापौर नंदा जिचकार यांना संपूर्ण ऑनलाईन पेमेंटची आणि व्हॅनच्या कार्यप्रणालीची माहिती दिली. यावेळी मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.