Published On : Wed, Jun 2nd, 2021

नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या -डॉ. कुमार

Advertisement

मान्सूनपूर्व तयारीचा आढावा,एसडीआरएफची पथके तैनात, सिंचन प्रकल्पांची स्ट्रक्चरल ऑडिट

नागपूर : हवामान विभागाकडून मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्यामुळे विभागातील नद्यांच्या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये जीवित तसेच पिकांची व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व करण्यात आलेल्या तयारीचा आढावा डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या बैठकीत भारतीय सेनादलाचे कर्नल बढिये, भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर लक्ष्मण के. राव, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर पंकज डहाणे, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता श्री. पवार, महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्रीकांत फडके, विकास उपायुक्त अंकुश केदार, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल, पोलीस उपायुक्त राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

सिंचन प्रकल्पामधून पुराचे पाणी सोडताना नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना देताना विभागीय आयुक्त म्हणाले की, मागील वर्षी पुरामुळे बाधित झालेली गावे तसेच पूर नियंत्रण रेषेनुसार बाधित होणाऱ्या गावांमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून विभागात मॉक ड्रिल आयोजित करावी यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणा उपस्थित राहील याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जिल्हा तसेच तालुकास्तरावरील नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहतील तसेच या नियंत्रण कक्षामध्ये आवश्यक माहितीसह तात्काळ प्रतिसाद मिळेल याची खबरदारी घेण्यात यावी. आंतरराज्य वाहणाऱ्या नद्यासंदर्भात पावसाची तसेच पुराच्या माहितीचे आदान-प्रदान करावे. जिल्ह्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत आपत्ती निवारणासाठीचे सर्व साहित्य सुस्थितीत असून तात्काळ वापर करणे शक्य आहे यादृष्टीने प्रमाणित करुन त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.

कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे मान्सून कालावधीत आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात कोविड-19 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घ्यावी. शेतपीक, फळपीक नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध होईल यादृष्टीने जिल्हास्तरावर नियोजन करावे. आदी सूचना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिल्या.

नैसर्गिक आपत्तीच्या बैठकीत तात्काळ उपाययोजनेच्यासंदर्भात विभागामध्ये समन्वय ठेवावा. तसेच कर्मचाऱ्यांना यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी एसडीआरतर्फे जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम राबवावेत, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

हवाई दलातर्फे पूर परिस्थिती बाधित कुटुंबांना अन्नाचे पाकिटे वितरित करताना ती सुस्थितीत राहतील यादृष्टीने जिल्हास्तरावर खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुराचे पाणी सोडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांना आवश्यक पूर्वसूचना मिळाल्यास यंत्रणा सज्ज ठेवता येईल. बाधित गावांमध्ये भारतीय सेनेतर्फे मदत पुरविण्यासाठी प्रशासनातर्फे समन्वय असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी आदी सूचना यावेळी विविध विभागाकडून करण्यात आल्या.

बियाण्यांची उगवणक्षमता तपासल्यानंतरच पेरणी करा
आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

खरीप हंगाम नियोजन तसेच खते व ‍बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

विभागात खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करुन त्याऐवजी निंबोळी आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत असून सरासरी दहा टक्के रासायनिक खत कमी करण्यासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने धान व सोयाबीनची पेरणी करताना पट्टापद्धतीचा वापर करणे, कापूस कापसाची लागवड, बीबीएस पद्धतीने करणे तसेच किड रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, सोयाबीन बियाण्यांची मागणीनूसार पुरवठा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर नियोजन करावे. विभागात 1 लाख 61 हजार क्विंटलची मागणी असून पुरवठा त्यानुसार नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विभागात रासायनिक खतांच्या मागणीनुसार युरीया, डीएपी, संयुक्त खते आदींचा साठा उपलब्ध आहे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत नागपूर विभागाला 6 हजार 300 चे लक्ष्यांक आहे, त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

खरीपासाठी 4 लाख 32 हजार हेक्टर नियोजन
जलसंपदा विभागातर्फे खरीप हंगामासाठी 4 लाख 29 हजार 177 हेक्टरचे क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. मागील वर्षी 3 लाख 30 हजार 306 हेक्टर खरीप क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी यांनी दिली.

खरीप हंगामासाठी 2020-21 या वर्षासाठी एकूण 5 लाख 86 हजार 406 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एकूण 5 लाख 43 हजार 313 हेक्टर सिंचन साध्य झाले आहे. यावर्षी खरीपासाठी 4 लाख 32 हजार 055 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.

विभागात खरीप सिंचनाच्या 10 मोठे प्रकल्प, 51 मध्यम व 336 लघु असे एकूण 397 प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे, सगुणा पद्धतीने धान पिकांची लागवड करणे, पाणी वापर काटकसरीने करणे याबाबत गावांमध्ये जावून जागृती करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांनी दिली.

प्रारंभी प्रज्ञा गोडघाटे यांनी कृषी विभागाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

Advertisement
Advertisement