खडगी मैदानाचे उद्घाटन
नागपूर: शहराच्या विविध भागात सुमारे 300 मैदाने तयार करण्यात आली आहेत. या मैदानांवर दररोज सकाळी 1 लाख व सायंकाळी 1 लाख लोकांनी, मुलांनी खेळ खेळावे, व्यायाम करावा. शहरातील मैदाने ही लोकांची मालमत्ता आहे. त्या मैदानांची जपणूक करा, असे आवाहन केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
पश्चिम नागपुरातील प्रेरणानगर फ्रेंड्स कॉलनी या परिसरात असलेल्या खडगी मैदानाचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या मैदानाला या भागातील प्रतिष्ठित नागरिक दादाराव खडगी यांचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर मायाताई इवनाते, संदीप जाधव, विक्रम ग्वालबंसी, संजय बंगाले, विनोद कन्हेरे, किसन गावंडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- भविष्यात चांगले नागरिक तयार करायचे आहेत, तसेच चांगले व्यक्तित्त्व तयार करायचे असेल तर मुलांनी मैदानांवर खेळणे अनिवार्य आहे. दुर्दैवाने आमच्या राहणीमानाचा विचार केला तर मैदानावर जाण्यास आमच्याकडे प्राधान्य नाही. मैदानांवर सुविधाही नाही. दोन वर्षापूर्वी आपण खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात 53 हजार खेळाडूंनी विविध खेळांचे प्रदर्शन केले आणि 3 ते 4 लाख रसिकांनी हा महोत्सव पाहिला. खेळांमुळे, व्यायामामुळे आरोग्य आणि व्यक्तिमत्त्व सुधारते. पण आज काल सर्वांच्या घरीच लहान मुलांच्या हातात मोबाईल दिले जातात. त्यांच्या हातात मोबाईल देऊन आपण त्यांचे भविष्य खराब करीत आहोत, याकडेही ना. गडकरी यांनी लक्ष वेधले.
शहरात सुमारे 300 मैदाने आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तयार केली आहेत. ही सर्व मैदाने नागरिकांच्याच स्वाधीन करणार आहोत. त्या त्या भागातील नागरिकांना खेळासाठी, व्यायामासाठी सुविधा उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले-या मैदानांच्या देखभालीसाठी नागरिकांची एक समिती तयार करून या समितीच्या स्वाधीन ही मैदाने करण्यात यावी. शहरात शिक्षणाच्या, आरोग्याच्या सुविधा मिळावा, शहराचा सांस्कृतिक विकास व्हावा, नागपूर हे स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त व्हावे, सर्वच क्षेत्रात शहराची प्रगती व्हावी या भावनेतून हे सर्व केले जात आहे, असेही ना. गडकरी म्हणाले.