जागतिक कर्करोग जनजागृती दिनी महिला सफाई कामगारांशी साधला संवाद
नागपूर : धावपळ आणि धकाधकीच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडेच वेळ नाही आहे. त्यातल्या त्यात स्त्रीला तर मुळीच नाही. स्त्री शिवाय कुटुंबाला शोभा नाही त्यामुळे स्त्रीयांनी आपल्या कुटुंबासोबतच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन उपमहापौर मनीषा धावडे यांनी केले. गुरूवारी (ता. ४) जागतिक कर्करोग जनजागृती दिनानिमित्त पाचपावली सुतीका गृह येथे आयोजित कर्करोग जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. मनपा आणि अमेरीकन ऑन्कोलाजिस्ट इंस्टीटयूटच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक कर्करोग जनजागृती दिनानिमित्त महानगरपालिकेद्वारे पाचपावली सूतीकागृह येथे महिला सफाई कामगारांची गर्भाशयाच्या कर्करोगाची नि:शुल्क ‘पॅप स्मिअर’ चाचणी करण्यात आली. कर्करोग जनजागृती कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, सहाय्यक वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, पाचपावली सुतीकागृहाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुषमा खंडागळे, आशीनगर झोनचे झोनल वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपंकर भिवगडे, डॉ. प्रिती झरारिया, एनएचयुएम व आरोग्य समन्वयक दिपाली नागरे, टाटा ट्रस्टचे डॉ. श्रृती आंडे, मिनाक्षी गोफणे, लक्ष्मण शिंदे, गोकुल हिंगवे आदी उपस्थित होते.
उपमहापौर मनिषा धावडे म्हणाल्या, सध्या महिलांना आरोग्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. दरवर्षी महिला कर्करोगग्रस्तांची संख्या वाढत जात आहे तसेच या आजाराने मृत्युचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कर्करोग न होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी आणि नियमित गर्भाशयाच्या कर्करोगाची चाचणी करण्याचे आवाहन उपमहापौर मानिषा धावडे यांनी केले. महानगरपालिकेतर्फे महिला सफाई कर्मचाऱ्यांना कर्करोगाची लस नि:शुल्क देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही उपमहापौर मनिषा धावडे यांनी यावेळी दिले.
पाचपावली सूतीकागृहाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. सुषमा खंडागळे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून महिला सफाई कामगारांना विविध प्रकारच्या कर्करोगाविषयी माहिती देउन जनजागृती केली. कर्करोगाचे निदान आणि उपचार याविषयी बोलताना डॉ. सुषमा खंडागळे म्हणाल्या, पहिल्या टप्यातच कर्करोगाचे निदान झाल्यास त्यावर योग्य उपचार करून रूग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी नियमित कर्करोगाची चाचणी करणे आवश्यक असल्याचेही म्हणाल्या.
या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. स्तनाच्या कर्करोगाच्या तुलनेत गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्युचे प्रमाण अधिक आहे. असुरक्षित संभोग, धुम्रपान, अस्वच्छता, मौखिक गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होतो. मात्र सकारात्मक दृष्टीकोण आणि नियमित तपासणीने गर्भाशयाच्या कर्करोगाला दूर ठेवता येऊ शकतो, असेही डॉ. सुषमा खंडागळे यांनी यावेळी सांगितले.