वॉक अण्ड टॉक विथ मेयर उपक्रम : अतिक्रमणासाठी विशेष मोहिम राबविणार
नागपूर: नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घ्या. स्थानिक नगसेवकांच्या सूचनांकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. शुक्रवारी (ता.28) गरोबा मैदान येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात वॉक अण्ड टॉक विथ मेअर उपक्रमाअतंर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह लकडगंज झोन सभापती राजकुमार साहू, माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेविका कांता रारोकर, मनीषा धावडे, लकडगंज झोन सहायक आय़ुक्त सुभाष जयदेव, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्य़ाने उपस्थित होते.
प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी उद्यानाची पाहणी केली. उद्यानातील सुलभ शौचालयाचीदेखील आतून पाहणी केली. शौचालयाची आणखी गरज असल्याची नागरिकांनी मागणी केली. यावर महापौर निधीतून महिलांसाठी व पुरूषांसाठी प्रत्येकी दोन शौचालय बांधण्याचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. परिसरात बांधकामचे मटेरियल आढळून आले, आजच्या आज हा कचरा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. कंपोस्टिंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर महापौरांनी उद्यानात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्न महापौरांपुढे मांडले. गणेश हुमने यांनी उद्यानात व परिसरात स्वच्छता व अतिक्रमणाबाबत समस्या मांडली. नगरसेवकांनी किमान आठवड्यातून एकदा उद्यानात फेरफटका मारावा, अशी सूचना मांडली. नंदकिशोर खोब्रागडे यांनी प्रभागात पिण्याच्या दुषित पाण्याची समस्या मांडली यासोबतच नागनदी प्रकल्पांअंतर्गत नागनदीच्या दोन्ही बाजूस मोठ्या सिवरेज लाईन टाकून सर्व सांडपाणी थेट भांडेवाडी येथे नेण्याची कल्पना मांडली. नामदेव ठाकरे यांनी उद्यानात अनुचित प्रकार घडू नये याकरिता सिसिटिव्ही कॅमेरे लावण्याची सूचना केली. विनय व्यास यांनी प्रभागातील काही पथदिवे बंद असतात, रात्री रस्त्यांवर अंधार असतो, अशी तक्रार केली.
याशिवाय सरिता भार्गव, दीपक रामटेके, संगिता वालदे, मीना बानाईत यांनी परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण आणि असमाजिक तत्त्वे याबाबत तक्रार महापौरांपुढे मांडल्या. श्यामलता गोसावी यांनी अंगणवाडी सुरू करण्यासाठी मनपाची जागा उपलब्ध करून देण्याबाबत समस्या मांडली. हरिश खंडाईत यांनी हायटेशन लाईन बद्दल समस्या मांडली. संजय हरकत यांनी उद्यानातील खेळणी दुरूस्त करण्याबाबत मागणी केली. संगिता वालदे यांनी उद्यानात महिलासांठी स्वतंत्र व्यायामासाठी सायकलची व्यवस्था करून देण्याबाबतची सूचना मांडली. राजकुमार पाटील यांनी मनपाच्या संबंधित झोन अधिकाऱ्यांची नावे व मोबाईल नंबरची यादी उद्यानातील दर्शनी भागात लावावी, असे सूचित केले.
नागरिकांच्या सर्व समस्यांची दखल गांभीर्यांने घेतली जाईल, असे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले. परिसरातील वाढत्या अतिक्रमणासाठी विशेष मोहिम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या सूचना झोननिहाय तीन प्रतींमध्ये सादर कराव्यात, असे आवाहन केले. शहराच्या विकासामध्ये नागरिकांचे महत्व अधिक आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा ओला सुका असा वर्गीकृत करून द्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. आपल्या तक्रारी व सूचना यानंतर उद्यानात किंवा झोनमध्ये ठेवण्यात आलेल्या सूचना पेटीमध्ये टाकाव्या. लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करू, असेही महापौर यांनी सांगितले. उद्यान अधीक्षक व निरिक्षक तसेच झोनच्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नावे व मोबाईल क्रमांकाचे फलक उद्यानातील दर्शनी भागात लावण्यात यावे, असे महापौरांनी निर्देश दिले.
यावेळी नरेंद्र बोरकर यांनी परिसरात गडरलाईन दुरूस्तीचे तीस लाखाच्या निधीचे काम प्रस्तावित असल्याचे सांगितले. या कामाच्या निविदा पूर्ण झालेल्या असून लवकरात लवकर कार्यादेश देऊन कामाला सुरूवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल मैदानाच्या सौदर्यींकरणासाठी 20 लाखाचा निधी मंजूर झालेला असून त्यात हायमास्ट लाईट्स, शौचालय, खेळणी नवीन लावण्याचे काम लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले