नागपूर : शहरातील धंतोली, काँग्रेसनगर येथील मनपाच्या लिज धारकांच्या समस्यांसंदर्भात तातडीने आवश्यक कार्यवाही करून तोडगा काढण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
लिज धारकांच्या विषयांच्या संदर्भाने गुरूवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धंतोली झोन सभापती लता काडगाये, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, विजय गुरूबक्षानी आदी उपस्थितीत होते.
धंतोली, काँग्रेसनगर भागामध्ये मनपाचे प्लाट आहेत. या संदर्भात तेथील लिजधारकांना डिमांड दिले जात आहेत. हे डिमांड भरण्याबाबत लिजधारकांकडून आक्षेप नोंदविण्यात येत असून याबाबत विशेष बैठक घेण्यात आली. यासंदर्भात प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी सांगितले की, मनपातर्फे ७१ प्लाट लिजवर देण्यात आले असून त्याचे विभाजन करून १०९ प्लाट तयार झालेले आहेत. हे प्लॉट स्वत: करीता घर बांधून राण्याकरीता मनपाव्दारे देण्यात आले होते. यापैकी ६५ लोकांनी अर्ज सादर केले असून त्यातील ३७ जणांचे कागदपत्रेही जमा झालेली आहेत.
१५ जणांकडून मात्र डिमांड भरण्यात आले नसून २८ जणांकडे अर्ज प्रलंबित आहे. मनपातर्फे लिजवर देण्यात आलेल्या जागेवर आजच्या स्थितीत अनेक इमारती दुकाने, शॉपिंग मॉल बिना परवानगीने उभारण्यात आल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या ठरावानुसार अनर्जीत रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निणर्यानुसारच लिजधारकांना नोटीस देण्यात आल्याचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी सांगितले.
१९३७ मध्ये झालेल्या करारामध्ये लिजधारकांना पूर्वपरवानगी शिवाय बांधकाम करण्याचे नमूद असल्याचा युक्तीवाद यावेळी लिजधारकांकडून करण्यात आला. मनपा क्षेत्रात मनपाच्या जागेवर बांधकाम करताना पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांनी यावेळी सांगितले. यासंदर्भात लिजधारक आणि मनपा प्रशासनाद्वारे आपसात सविस्तर चर्चा करून त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.