Published On : Wed, Jul 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

संघर्षनगरवासीयांची घरे वाचविण्याबाबत तात्काळ कार्यवाही करा

ॲड. धर्मपाल मेश्राम यांची मागणी : भांडेवाडी येथील एसटीपीच्या पाण्यामुळे घरे धोक्यात
Advertisement

नागपूर. भांडेवाडी येथील सिवेज ट्रिटमेंट प्लांट (एसटीपी) अर्थात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामध्ये मध्ये प्रक्रिया करून सोडण्यात आलेल्या उर्वरित पाण्यामुळे संघर्षनगर वस्तीतील घरे धोक्यात आली आहेत. ही घरे धोक्यापासून वाचविण्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नागपूर महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

नागरिकांच्या तक्रारीवरून ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सदर ठिकाणी भेट देउन निरीक्षण केले. भांडेवाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करून उर्वरित पाणी संघर्षनगर झोपडपट्टीमधून वाहणाऱ्या नाल्यामध्ये सोडले जाते. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे नाल्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.

त्यामुळे नाल्यालगतच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात तात्काळ उपाययोजना न केल्यास स्थानिक नागरिकांची जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाद्वारे सदर तक्रारीची गांभीर्याने दखल घेउन तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ॲड. मेश्राम यांनी यावेळी केली.

Advertisement

याप्रसंगी स्थानिक नागरिक सर्वश्री सुनील आगरे, रेणुका सिल्वरू, दुर्गा कुक्वास, विकास शाहू, धनराज टंडन, इंदिराबाई शेंडे आदींनी आपल्या तक्रारी मांडल्या.