Published On : Fri, Jul 1st, 2022
By Nagpur Today Nagpur News

वीज पडून होणारे मृत्यु जिल्ह्यात कमी होतील यासाठी स्वरक्षणाची जबाबदारी घ्या – जिल्हाधिकारी आर. विमला

नागपूर : वीज पडून मृत्यु ही अघटीत घटना आहे. मात्र काही प्राथमिक काळजी घेतली, जागरुकता दाखविली व प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर ही संख्या कमी होऊ शकते, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज वेब चर्चेत केले.

जिल्ह्यात वीज पडून मृत्यु पावलेल्या कुटुंबाची भेट मी स्वत: घेतली, घरचा कर्ता माणूस गेल्यानंतर कुटुंबाची काय परिस्थिती होते हे प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावर उपाय म्हणून पावसाळ्यात विजेचे कडाडणे व पुरपरिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Gold Rate
Wednesday 26Feb. 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला यांची ‘पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारीत करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी जिल्हाधिकारी यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी केले. उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, पियुष चिवंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यावेळी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे याबाबत चित्ररथाद्वारे जिल्ह्यात सर्वदूर जनजागृती करण्यात येत आहे. विज पडल्यामुळे इतर अपघातामुळे आजपर्यंत 72 नागरिकांचा मृत्यु झालेला आहे. यासर्व बाबींची काळजी घेता नागरिकांनी जागरुक राहणे फार गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

आपत्तीच्या वेळी समयसुचकता आवश्यक असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, अनभिज्ञतेमुळे अनेक अपघात होतात. शेतातील अपघात प्रामुख्याने जास्त होतात, त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी गावागावात या विषयी माहिती चित्ररथाद्वारे देण्यात येत आहे. पुरपरिस्थतीत नागरिकांनी रस्ता ओलांडतांना सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तरच अपघात कमी होतील, असेही त्या म्हणाल्या.

पावसाळ्याच्या काळात अतिसार, कॉलरा, गॅसट्रो आदी आजार सतावतात. याबाबत शुध्द व स्वच्छ पाण्याचा वापर करावा, पाणी गाळून व उकळून प्या व सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले. अतिसारासाठी ओआरएस कॉर्नर आरोग्य विभागाने तयार केले आहे. ओआरएस व झिंक गोळयाचा वापर करा. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 1377 या टोल फ्रि क्रमांकाशी संपर्क साधा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी केले. या वेब चर्चेत 86 लोकांनी सहभाग नोंदविला.

Advertisement