नागपूर : शहरातील अभ्यंकर नगर परिसरात भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या तरुणाला रहिवाशांनी फटकारले असता त्याने रागाच्या भरात मित्रांसोबत मिळून वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी बजाज नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सहा तरुणांना अटक केली आहे. हा मुद्दा आज अर्थसंकल्पीय अधुवेशनात पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे विधानसभेत उपस्थित केला.
पोलीस विभागाच्या निष्काळजीपणामुळे मद्यपी आणि त्याच्या समर्थकांना हिम्मत मिळाली, ज्यामुळे त्यांनी अभ्यंकर नगरमध्ये १० हून अधिक नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केली आणि स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घडलेल्या या प्रकारामुळे नागपुरात पोलीस विभागाकडून गुंड आणि प्रभावशाली व्यक्तींना मिळणारे संरक्षण किती गंभीर स्वरूपाचे आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले असून, संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.