Published On : Sat, Jun 2nd, 2018

मटन-मच्छी मार्केटचे काम मार्गी लावा

Advertisement

नागपूर: मच्छीसाथ येथील मटन-मच्छी मार्केट बांधकामच्या पूर्ततेसाठी दिलेली वाढीव मुदत संपून १४ महिन्याचा काळ उलटला. प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी होणारा वेळ खपवून घेतला जाणार नाही. तातडीने सोमवार ४ जूनपर्यंत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून लवकरात लवकर मटन मार्केटचे काम मार्गी लावा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी दिले.

शुक्रवारी (ता. १) यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर आज (ता.२) कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांनी मच्छीसाठी येथील निर्माणाधीन मटन-मच्छी मार्केटला भेट दिली. यावेळी भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, मुख्य अभियंता मनोज तालेवार, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, उपअभियंता कोहाड, कंत्राटदार अमित कावळे उपस्थित होते.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मागील अर्थसंकल्पात सदर इमारतीसाठी ६० लाखांची तरतूद असतानाही केवळ प्रशासकीय दिरंगाईमुळे वाढीव मुदतीनंतरही १४ महिने उलटून काम पूर्ण झाले नाही. यामुळे ६० लाख रुपये परत गेले. याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मटन मार्केट बांधकामाची निविदा प्रक्रिया सन २०१३ मध्ये झाली. सन २०१६ मध्ये कार्यादेश निघाला. आठ महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करायचे होते. मात्र ते न झाल्याने ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली. वाढीव मुदतीतही काम पूर्ण झाले नाही. त्यानंतर कुठलेही कारण नसताना तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून तब्बल १४ महिने काम बंद राहिले. रखडलेल्या कामामुळे मटन मार्केट मालकांना सोबतच परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. जर आता सोमवार ४ जूनपर्यंत तातडीने प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, असेही निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.

वाढीव निधीसाठी मंजुरी घेताना इमारतीच्या विद्युत कामाकरिता निविदा काढण्याची प्रक्रियाही सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक कल्पक भानारकर, तुषार लारोकर, मटन मार्केट असोशिएशनचे राजू लारोकर, जगदीश पारधी, नितीन लारोकर, मुकेश लारोकर, गिरीधारी कटारे, वामन लारोकर, राजेश पारधी, कुणाल लारोकर, विष्णू तुमाने, पियुष लारोकर उपस्थित होते.


दौऱ्यानंतर कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी सदर प्रकरणासंदर्भात आयुक्त वीरेंद्र सिंह यांना कामातील दिरंगाईबद्दल माहिती दिली. या कामाकडे अधिकाऱ्यांनी अक्षम्य दुर्लक्ष केले असून दिरंगाई करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी सूचना केली. यावर आयुक्तांनी सदर प्रकरणासंदर्भात माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

आखाड्याच्या जुन्या इमारतीत ग्रंथालय
मटन मार्केटच्या इमारतीसमोरच जुनी आखाड्याची इमारत आहे. ह्या इमारतीचा सध्या काही उपयोग नाही. त्याचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करण्याचा सल्ला माजी महापौर प्रवीण दटक यांनी तेथील नागरिकांना दिला. या इमारतीमध्ये ग्रंथालय, अभ्यासिका किंवा ई-लायब्ररी व्हावी यासाठी एक प्रस्ताव तयार करण्याची सूचना श्री. दटके यांनी केली. इमारतीची डागडूजी करून आणि नूतनीकरण करून विधायक कार्यासाठी त्याचा वापर करण्यासाठी सांगितले.

Advertisement
Advertisement