लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली महाराष्ट्रातील मंदिरे लॉकडाऊनच्या काळात पूर्णत: बंद आहेत. दुकाने, मॉल, मास, दारूची विक्री सुरू करणाऱ्या सरकारने अद्याप मंदिरे भक्तांसाठी खुली केलेली नाहीत. ती उघडावीत यासाठी आता संत, अध्यात्मिक गुरू, मंदिरांचे विश्वस्त यांना रस्त्यावर उतरण्याची पाळी आली आहे. या सर्वांचा समावेश असलेल्या अध्यात्मिक समन्वय समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ‘दार उघड, उद्धवा दार उघड हे अभिनव आंदोलन येत्या शनिवारी (२९ ऑगस्ट) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मंदिरे तातडीने उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ला राज्यभर, दार उघड, उद्धवा दार उघड हे आंदोलन करण्याचा निर्णय अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या व्हीडीओ कान्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
या आंदोलनात ठिकठिकाणी घंटानाद करून सरकारचे लक्ष वेधण्यात येणार आहे. या बैठकीला शिर्डीच्या साईसंस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, श्री विठ्ठल रुख्मिीणी मंदिर समिती; पंढरपूरचे अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर, माजी अध्यक्ष अतुल भोसले, खा.जयसिद्धेश्वर स्वामी महाराज, शिवाजी महाराज मोरे, प्रकाशभाऊ जवंजाळ, अ.भा.वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, सुदर्शन महाराज कपाटे, पंडित सतीश् शुक्ल, महामंडलेश्वर श्री जनार्दन हरी महाराज, गुरुप्रीतसिंग सोखी, भूषण कासलीवाल, सिंधी समाजाचे गुरुमुख जगवानी आदी उपस्थित होते.
पुनश्च हरिओम सरकारने केले तर खरे पण आमचा पांडुरंगहरी आणि अन्य देवदेवतांचे स्थान असलेली मंदिरे अजूनही बंदच आहेत. दारूची दुकाने सुरू करण्यात आली पण मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मॉल, दारुची दुकाने, मासविक्री सुरू झाली पण मंदिरे बंद ठेवली जात असतील तर योग्य बाब नाही. दारू पिणारे आनंदात फिरत आहेत आणि भजन-पूजन करणाऱ्या भाविकांवर मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल होत आहेत. भाविकांच्या आस्थेचा सरकार विचार करीत नाही. देवस्थानांच्या परिसरात दुकाने-व्यवसाय असलेल्या हजारो लोकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे मंदिरे उघडणे अत्यावश्यक असल्याचे अतुल भोसले (अतुल भोसले ) यांनी म्हटले आहे.