नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच आता ‘सनातन धर्म’ या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केले. मलेरिया, डेंग्यू, करोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सनातन धर्मावरील टीकेवरून आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संताप व्यक्त केला. सनातन धर्माविरोधी बोलणं आणि स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजणं, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही. सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना लोक त्यांची जागा दाखवतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार नक्की संपुष्टात येतील, असेही फडणवीस म्हणाले.