‘कोरोनामुक्त नागपूर’ करुया : आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन
नागपूर : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या निर्णयाचे स्वागत करीत नागपूर कोरोनामुक्त करुया असे आवाहन केले.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर नागपुरात रुग्णसंख्या वाढली. सध्या बाजार हे गर्दीचे ठिकाण असून तेथील गर्दी कशी नियंत्रित करायची, यासंदर्भात चर्चा करण्याकरिता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात विविध व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी (ता. १८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, उपायुक्त निर्भय जैन, श्रमिक विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल लोया, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त अभय देशपांडे, शरद कोलते यांच्यासह नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया, एनसीसीएलचे विष्णू पचेरीवाला, रामअवतार तोतला, रेडिमेड मार्केट असोशिएशनचे अध्यक्ष रितेश मोदी, जागनाथ रोड क्लॉथ मार्केट असोशिएशनचे सचिव कल्पेश मदान, स्टील ॲण्ड हार्डवेअर चेंबर ऑफ विदर्भचे अध्यक्ष राजेश लखोटिया, सचिव संजय अग्रवाल, एनएचआरएचे अध्यक्ष तेजिंदरसिंह रेणू, नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे सचिव हेतल ठक्कर, नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव संजय शिरपूरकर, व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, एनसीसीएलचे सहसचिव तरुण निर्बाण आदी उपस्थित होते.
व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, ३१ मे पर्यंत नागपुरात कोव्हिड रुग्णांची संख्या ४०० च्या जवळपास होती. मात्र, केवळ दीड महिन्यात १७०० ने आकडा वाढला. सद्या बाधितांची संख्या २१०० च्या घरात आहे. मृत्यूसंख्याही १३ वरून २५ वर पोहोचली. यामागील सर्वात मोठे कारण नियमांचे पालन करण्याचे बंधन असतानाही ते पाळले जात नाही. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण म्हणजे बाजार आहे. बाजारातही नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे. सम-विषम तारखेचा नियम असतानाही त्याचे उल्लंघन होणे, दुकानात क्षमतेपेक्षा अधिक ग्राहक येणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे या सर्व बाबींमुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी स्वत: पुढाकार घेणे आवश्यक आहे.
किमान स्वत:च्या दुकानासाठी व्यापाऱ्यांनी नियम पाळायला आणि दुकानात येणाऱ्यांना नियम पाळण्याबाबत सांगितले तरी कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होवू शकते पर्यायाने लॉकडाऊन नव्याने लावण्याची गरज पडणार नाही. यासाठी व्यापाऱ्यांच्या सर्वच असोशिएशनने पुढाकार घेऊन आजपासूनच स्वयंशिस्त पाळण्यासोबत येणाऱ्या ग्राहकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी सांगीतले की, बहुतांश दुकानदार नियमांचे पालन करतात परंतु जे नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यास व्यापारी संघटनांचे प्रतिनिधीनी पाठींबा दिला.
कोव्हिड ॲम्बॅसेडर आणि टास्क फोर्स
यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडतानाच अतिशय चांगल्या सूचनाही केल्या. यापुढे आम्ही प्रत्येक व्यापारी कोव्हिड-१९च्या नियंत्रणासाठी ‘कोव्हिड ॲम्बॅसेडर’ म्हणून कार्य करण्यास तयार आहोत, अशी सूचना श्री. बी.सी. भरतिया व श्री.रितेश मोदी यांनी केली. प्रत्येक व्यापाऱ्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून असणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रशासनाच्या नियमांमुळे घरी बसावे लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांचा उपयोग करून प्रत्येक व्यापारी असोशिएशन एक टास्क फोर्स तयार करेल. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगण्यापासून मास्क लावण्याच्या सूचना देण्याचे कार्य ही टास्क फोर्स करेल. बाजार परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीसुद्धा मनपाच्या सहकार्याने कार्य करेल, अशी सूचना श्री. अग्रवाल यांनी केली. नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि नागपूर सराफा असोशिएशनचे राजेश रोकडे यांनी शहरात ठिकठिकाणी जनजागृतीचे फलक असोशिएनशनतर्फे लावण्याची सूचना केली. या सर्व सूचनांचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वागत करीत मनपाच्या वतीने या कार्यात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. असाच लोकसहभाग राहिला तर कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही, असेही ते म्हणाले.
स्वातंत्र्यदिन हा कोरोनामुक्ती दिन ठरावा!
व्यापाऱ्यांनी संघटितपणे मनपा प्रशासनाला साथ दिली तर कोरोना नागपुरात हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. यंदाचा स्वातंत्र्यदिन हा नागपूरसाठी ‘कोरोनामुक्ती दिन’ करण्याचा निर्धार करु या असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. या आवाहनाला व्यापारी असोशिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी दाद देत त्यादृष्टीने लवकरच संपूर्ण नियोजन करण्याचे आश्वासन दिले. मनपा अधिकाऱ्यांच्या समवेत समन्वय ठेवून हे ध्येय गाठण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचाही विश्वास व्यापारी असोशिएनशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.