नागपूर: कोव्हिड-१९ विषाणूशी लढणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी टाटा ट्रस्टतर्फे मनपाला कोव्हिड रिलीफ साहित्य प्रदान करण्यात आले.
टाटा ट्रस्टच्या वतीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सदर साहित्य सोपविण्यात आले. साहित्यामध्ये सात हजार लिटर सॅनिटायझर, तीन हजार पीपीई कीट, सहा हजार एन-९५ मास्क यांचा समावेश आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड-१९ विषाणूचे संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात अनेक संस्था हातभार लावत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासोबत टाटा ट्रस्ट नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.
कोव्हिडविरुद्धच्या लढाईतही टाटा ट्रस्टचे सर्व सहकारी विविध कार्यात सहभागी आहेत. टाटा ट्रस्टने कोरोना योद्ध्यांसाठी साहित्य देण्यासाठी घेतलेला पुढाकार हा निश्चितच समाजाप्रती असलेले दायित्व निभावणारा असल्याचे प्रतिपादन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.