नागपूर : नागपूर शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे अनेक वर्षांपासूनचा मालमत्ता कर थकीत आहे. ही थकीत रक्कम आणि चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर दिलेल्या उद्दिष्टानुसार वसूल करावायाचा आहे. या कार्यात दिरंगाई खपवून घेणार नाही. ३० सप्टेंबरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही तर संबंधित कर निरीक्षक आणि कर संग्राहकांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिला.
कर आकारणी संदर्भात झोननिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून सतरंजीपुरा झोनमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते. या बैठकीत समितीचे सभापती संदीप जाधव यांनी सर्व कर निरीक्षक आणि कर संकलकांना चांगलीच तंबी दिली.
महानगर पालिकेकडे सध्या मालमत्ता कर हेच एक उत्पन्नाचे स्त्रोत आहे. या माध्यमातून जर १०० टक्के वसुली झाली तर महानगरपालिकेला अन्य कुठून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. ही वसुली कर निरीक्षक आणि कर संग्राहकांवर अवलंबून आहे. मात्र, कर वसुलीत दिरंगाई होत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. यापुढे ही परिस्थिती बदलायची असेल तर प्रामाणिकपणे कार्य करा आणि कठोर मेहनत घ्या असा सल्ला देत यात यापुढे कुठलाही हलगर्जीपणा झाला तर अनुशासनात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी सभापती संदीप जाधव यांनी सतरंजीपुरा झोनचा वॉर्डनिहाय थकबाकी वसुली आणि कर वसुलीचा आढावा घेतला. थकबाकी वसुलीवर अधिकाधिक भर देऊन ३० सप्टेंबरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. चालू आर्थिक वर्षात एप्रिलपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत उद्दिष्टनिहाय केलेल्या कर निरीक्षक आणि कर संग्राहकांच्या कार्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
झोन सभापती यशश्री नंदनवार म्हणाल्या, कर निरीक्षक आणि कर संग्राहकांना वसुलीत जर कुठे अडचण येत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. नगरसेवकांचीही मदत घ्यावी. सर्वांनी मिळून एकत्रितपणे कार्य केले तर उद्दिष्ट्य साध्य होण्यात कुठलीही अडचण जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम म्हणाले, कर वसुली हा विषय स्वत: आयुक्त गांभीर्याने घेत असल्याने कुठलीही हयगय चालणार नाही. वेळीच कामगिरी सुधारा जेणेकरून आर्थिक वर्ष समाप्तीला धावपळ होणार नाही. कर वसुली आणि थकबाकी वसुलीला प्राधान्य द्या. थकबाकी असणाऱ्यांकडे आणि चालू कर वसुलीसाठी प्रत्येक घरी भेट द्या, असेही ते म्हणाले. बैठकीला झोनचे सर्व कर निरीक्षक, कर संग्राहक उपस्थित होते.