नागपूर: महाराष्ट्र राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौ. फूट (४६.४६ चौरस मीटर) अंतर्गत रहिवासी मालमत्तेचा मालमत्ता कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या ५०० वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करून मनपाला होणारी नुकसानभरपाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केली. गुरुवारी (ता. ६) मालमत्ता कर व कर आकारणी वसुलीबाबत स्थायी समिती सभापती कक्षात मालमत्ता विभागाची बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या ५०० वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (ता.४) मनपाच्या कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीत एकमताने पारीत करण्यात आला. राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरीबांच्या दृष्टीने हिताचा आहे. मात्र, यामुळे मनपाचे एका आर्थिक वर्षात सुमारे ३५ कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे होणारी नुकसान भरपाई राज्य सरकारने करावी, अशी मागणी सभापती प्रकाश भोयर यांनी केली.
स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर म्हणाले, जर राज्य शासनाने या मागणीवर शिक्कामोर्तब केले तर ५०० वर्ग फुटांपर्यंतच्या मालमत्ता धारकांना थकीत मालमत्ता कर भरल्यानंतरच ही माफी दिली जाईल. त्यामुळे सर्व थकीत मालमत्ता धारकांनी आपला कर लवकरात लवकर भरावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी स्थायी समिती सभापतींनी मालमत्ता कर वसुली बाबत आढावा घेतला. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर वसुलीचे ३३२ कोटी एवढे उद्दिष्ट आहे. यापैकी ५ जानेवारी २०२२ पर्यंत १५० कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली. ५०० वर्ग फुटापर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाने मनपाचे एकूण ३५ कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दीड लाखांहून अधिक मालमत्ता धारकांनी घेतला १० टक्के माफीचा लाभ
मागील वर्षी कोरोना महामारीनंतर नागरिकांना मालमत्ता करात दिलासा देण्यासाठी मनपाद्वारे अभय योजना लागू करण्यात आली होती. थकीत मालमत्ता कर धारकांना शास्तीत माफी तर नियमित कर भरणाऱ्यांना करात १० टक्के सूट देण्यात आली होती. नियमित कर भरणाऱ्या १ लाख ५४ हजार मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेतला.
मालमत्ता कर भरा, कारवाई टाळा
थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांविरुद्ध मनपाने कठोर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत शहरात ७ हजार १३० थकीत मालमत्ता कर धारकांवर वॉरंटची कारवाई करण्यात आली असून त्यांचे घर व खुले भूखंड जप्त करण्यात आले आहेत. यापैकी ३६० स्थावर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ५८ मालमत्तांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून २१ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ता कर धारकांनी आपले नियमित आणि थकीत कर लवकरात-लवकर भरुन आपली पाटी कोरी करावी, असे आवाहन स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी केले आहे.