नागपूर : नागपूरच्या सीताबर्डी भागातील गजबजलेल्या ग्लोकल स्क्वेअर मॉलमधून मंगळवारी दुपारी एक १५ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ निर्माण झाली. यातच मुलाचे अपहरण झाल्याची चर्चाही सुरु झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी असलेला अल्पवयीन मुलगा मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आपल्या मावशीसोबत नागपूरच्या सीताबर्डी भागातील ग्लोकल स्क्वेअर मॉलमध्ये खरेदीसाठी आला होता. यादरम्यान, मुलाने मावशीला सांगितले की तो बाथरूमला जात आहे.
मात्र बराच वेळ होऊनही तो परतला नाही. त्याच्या मावशीने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो काही सापडला नाही. काही व्यक्तींनी त्या मुलाचे अपहरण झाल्याचा अंदाज लावला.
या घटनेची तक्रार सीताबर्डी पोलिसांना देण्यात आली. पीएसआय माचनवाड यांनी तक्रारीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी मुलाचा शोध सुरू केला असता नवीन माहिती समोर आली आहे. हा १५ वर्षांचा मुलगा ना बेपत्ता झाला ना त्याचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. कल स्क्वेअर मॉलमध्ये खरेदीसाठी आपल्या मावशीसोबत आलेला मुलगा आपल्या मावशीला न सांगता आपल्या मूळ गावी त्याच्या पालकांच्या घरी निघून गेला. मुलाला त्याच्या पालकाची आठवण आल्याने तो स्वतःहून त्याठिकाणाहून निघून गेल्याची माहिती आहे.