नागपूर : भारत राष्ट्र समितीचा देशपातळीवर विस्तार होत आहे. महाराष्ट्र राज्यभरात सर्व शक्तिनिशी कार्य सुरू आहे. विदर्भात सर्वदूर पक्ष विस्तार करण्यासाठी नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते १५ जून रोजी होत आहे.
यानिमित्त कार्यकर्ता मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी “अब की बार किसान सरकार”चा नारा गुंजू लागला आहे. दरम्यान, आज चेन्नुर विधानसभेचे आमदार बलका सुमन यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
दिनांक १५ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री मा. ना. के चंद्रशेखर राव यांचे नागपूर विमानतळ येथे आगमन व स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता भारत राष्ट्र समिती पक्ष, (BRS) महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन प्लॉट नंबर 14, रामकृष्ण नगर, साई मंदिराजवळ, वर्धा रोड येथे होईल.
दुपारी २ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून, विदर्भातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होईल. त्यानंतर मुख्यमंत्री मा. ना. के चंद्रशेखर राव सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर यांनी केले आहे.