औरंगाबाद: संतापलेल्या भाजपा आमदाराने पोलीस निरीक्षकाला दमबाजी केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली. गुटख्याची गाडी सोडली नाही म्हणून गंगापूर- खुलताबादचे आमदार प्रकाश बंब यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
गंगापूर पोलिसांनी गुटख्याची एक गाडी पकडली होती. ती गाडी आमदार प्रकाश बंब यांच्या कार्यकर्त्याची होती, अशी चर्चा आहे. ती गाडी सोडण्यासाठी आमदार बंब यांनी पोलिसांना फोन केला. मात्र, पोलीस ऐकत नसल्याने आमदार बंब थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.
त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना दमबाजी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘कुठे काय चालते ते मला माहीत आहे. पोलिसांनी लोकप्रतिनिधींना शिकवू नये. आमदाराचा फोन आल्यावर कुठलीही गाडी सोडलीच पाहिजे आणि माझे म्हणणे ऐकत नसाल तर सीएम साहेबांकडून मुंबईतून बदली करायला लावेन’, अशी धमकी देत असताना आमदार प्रशांत बंब व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहेत.