नागपूर : औरंगजेबाची कबर काढून टाकण्यासाठी झालेले आंदोलन चिघळले. शहरात १७ मार्च रोजी रात्री महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.
या घटनेत मोठ्या प्रमाणात हिंसा झाल्याने अनेक जण यात गंभीर जखमी झाले. तर अनेक वाहने जाळण्यात आल्याने मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी ८० जणांना अटक केली.
पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरातील अनेक शाळांना अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली. संदीपानी आणि शाळा सेंटर पॉइंट स्कूल आणि अन्य शाळांचाही यामध्ये समावेश आहे. मात्र शिक्षण विभागाकडून शाळांना सुट्टीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाल परिसरातील सर्वच दुकाने बंद करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी बळजबरीने दुकाने बंद करण्यास सुरुवात केल्यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला. महाल परिसरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले.
महाल-गांधी गेटकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर ‘बॅरिकेडींग’ करून मार्ग बंद करण्यात आले. या परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.