नागपूर : मुंबई महानगर पालिकेसाठी लवकर निवडणूक पार पडणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेची सत्ता आहे. आता बीएमसीवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. मात्र नुकतेच एका सर्वेक्षणात असे दिसून आले की यंदाही मुंबईमहानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला.
नागपुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात अजित पवार यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकरने जनतेच्या मनात घर केले आहे. त्यामुळे मुंबईतील जनतेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर विश्वास आहे.
बीएमसीमध्ये सत्तेत येण्याचे भाजपचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. अनेक दशकांपूर्वी जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील [अविभाजित] शिवसेनेने बीएमसीवर ताबा मिळवला, तेव्हाच कोकणात आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पक्षाचा विस्तार होऊ लागला हे सर्वांना माहीत आहे. शिवाय, BMC चे बजेट देशातील अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे.
पण, गेल्या वर्षी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले त्यामुळे मुंबई शहरातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल सहानुभूतीची भावना आहे. सर्वेक्षणातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जास्त जागा मिळाल्याचे दिसून आले आहे, असे अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.