नागपूर : अमरावतीमधील मैदानात सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी थेट पोलिसांच्या कानशिलात लागवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ”परवानगी गेली चुलीत,अमित शहासमोर सभा घेऊ”, असे म्हणत प्रचंड आक्रमक होत कडू पोलिसांना भिडल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमेदवार देण्यात आला आहे. या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने अमरावती मधील सभेचे मैदान बुक करण्यात आले होते. मात्र, त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी मैदानावरच ठिय्या आंदोलन केले आहे. अखेर पोलिसांनीच आता भाजपचे गमचे गळ्यात घेऊन यावे आणि पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.
अमरावती येथील सायन्स स्कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेला सभेसाठी बुक केले होते. इतकेच नाहीतर त्याचे पैसे देखील भरले होते. मात्र, आता या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असून आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहा यांची सभा कशी होईल, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आमच्याकडे सर्व कागदपत्रे असताना देखील पोलिस अधिकारी आम्हाला सभेला परवानगी देत नाही. तर अमित शहा यांच्या सभेला परवानगी कशी मिळते? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केली. उद्या एक लाख कार्यकर्ते या मैदानावर जमा होणार असून सभा झाली नाही तर येथेच एक लाख कार्यकर्ते 26 तारखेपर्यंत ठिय्या देतील, असा इशाराही कडू यांनी दिला आहे.