नागपूर: शहरातील मध्यवर्ती रेल्वे स्थानकातून काल गुरुवारी एका महिलेने सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण केले. यानंतर रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. .हा गुन्हा केल्यानंतर आरोपी महिला पळून जाण्यात यशस्वी झाली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांना तिचा शोध घेणे आव्हानात्मक होते. मात्र केवळ २४ तासातच रेल्वे पोलिसांनी आरोपी महिलेला नरखेडच्या वरुड गावातून ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी आरोपी महिलेला बाळासह नागपुरात आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
ललिता आणि उमाकांत इंगळे (वय ३०) हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवासी आहे. ते रोजमजुरी करतात. त्यांना एक पाच वर्षांचा तर दुसरा सहा महिन्यांचा चिमुकला असून त्याचे नाव राम आहे. ललिता काहीशी गतीमंद आहे. घरगुती समस्यांमुळे वैतागलेले हे दाम्पत्य बुधवारी सायंकाळी गोंदिया येथे जायला निघाले. दरम्यान, बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांच्याकडे एक महिला आली. तिने इंगळे दाम्पत्याशी सलगी करून कुठे चालले, काय करता वगैरे माहिती काढली. इंगळेंनी गोंदियाला जात असल्याचे सांगताच, आरोपी महिलेने आपणही गोंदियाला जात आहे, असे सांगितले. नंतर ते सर्व रात्रीच्या पुणे-हटिया एक्सप्रेसने नागपूर स्थानकावर पहाटे १.४५ वाजता पोहचले. गोंदियाला जायला सकाळची गाडी असल्याने त्यांनी फलाट क्रमांक ४ वर मुक्काम केला. खूप भूक लागल्याचे सांगितल्यामुळे उमाकांतने पहाटे ३ वाजता सर्वांसाठी समोसे आणले. ते खाल्ल्यानंतर हे सर्व पहाटे ४ पर्यंत गप्पा करीत बसले. नंतर झोपी गेले. सकाळी ७.३० ला उमाकांतला जाग आली तेव्हा त्याला सहा महिन्याचा राम आईच्या कुशित दिसला नाही. त्याने पत्नीला उठविले आणि चिमुकल्याबाबत विचारणा केली. नंतर बाजुची महिलाही गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंगळे दाम्पत्य आपल्या पाच वर्षीय मुलाला सोबत घेऊन रेल्वे स्थानकावर चिमुकल्यासह त्या महिलेचाही शोध घेऊ लागले. सकाळचे ९ वाजले तरी ते दोघे आढळले नाही. त्यामुळे त्यांनी आरपीएफच्या माध्यमातून रेल्वे पोलीसांत तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही तपास महिलेचा २४ तासातच छडा लावला आहे.
या प्रकरणी ‘नागपूर टुडे’ने रेल्वे लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपी महिलेले ताब्यात घेण्यात आले असून नागपुरात आणण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.