लॉकडवूनचे काळजीपूर्वक पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन
रामटेक: शासनाच्या वतीने कोरोना पासून बचावासाठी लॉकडवूनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढविला असून सुधारित व मार्गदर्शक सूचनांचे आदेश जारी केले आहेत.रामटेक शहरात किराणा, औषधी ,दूध डेयरी व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत.बाकी सर्व दुकाने,गर्दीची स्थळे,मॉल,मार्केट बंद राहील.धार्मिक प्रार्थना स्थळे,सर्व प्रकारचे धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक,क्रीडा व राजकीय कार्यक्रम बंद राहतील.रस्ते ,बाजार,सार्वजनिक ठिकाणी,शासकीय कार्यालयात सामाजिक व शारीरिक अंतर राखावे तसेच मास्क बांधावे लागेल.
रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाईल व पान, खर्रा ,मद्य प्राशन करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यावर बंदी आहे.60वर्षावरील व्यक्ती,गरोदर स्त्रिया,10 वर्षांखालील बालके व दुर्धर आजार असलेली व्यक्ती यांनी वैद्यकीय कारण वगळता इतर कोणत्याही कारणासाठी बाहेर पडू नये.कोरोनापासून बचावासाठी महसूल,नगरपालिका व पोलीस प्रशासन अविरतपणे कार्य करीत आहे.
उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के,उपविभागीय पोलीस अधिकारी नयन अलुरकर,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, मुख्याधिकारी स्वरूप खरगे तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग सातत्याने लॉकडावूनच्या काळात कोरोना पासून बचाव तसेच संरक्षणासाठी परिणामकारक उपाययोजना व विविध लोकोपयोगी कामांचे नियोजन व अंमलबजावणी करीत आहेत.यापूर्वी रामटेककर नागरिकांनी सातत्यपूर्ण सहकार्य केले असून पुढील काळातही नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच रामटेक शहराला कोरोनामुक्त राखण्यास यशस्वी करावे असे निवेदन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.