नागपूर : काँग्रेसच्या दलदलीतून सुटका होण्यासाठी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे देश उभा राहिला. एनडीएची स्थापना करण्यात आली. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीतून सुटका व्हावी म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविले. पण अहंकारी भाजपाला एनडीएची गरज भासली नाही. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने युती मोडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भाचे संपर्कप्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्यात केला.
पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यासाठी किर्तीकर यांचे प्रयत्न आहेत. यातूनच नागपूर शहर शिवसेनेतर्फे उत्तर नागपुरातील गुरुनानक सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार प्रकाश जाधव, माजी जिल्हाअध्यक्ष सतीश हरडे, माजी उपहमापौर किशोर कुमेरिया, माजी नगरसेवक बंडू तळवेकर, महिला संपर्क प्रमुख मंदाकिनी भावे, महिला आघाडीच्या शहर प्रमुख अलका दलाल, सूरज गोजे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
किर्तीकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुकीतही भाजपाची लाट होती. मात्र आता लाट संपली आहे. नोटाबंदी देशासाठी घातक ठरली. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. अनके छोटया व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशात एकप्रकारची हुकूमशाही सुरू आहे. काही वर्षापूर्वी भाजपाकडे पैसा नव्हता, परंतु आता ज्या- ज्या ठिकाणी निवडणुका होतात. तेथे भाजपाकडून पैशाचा वापर केला जातो. असे असले तरी विदर्भामध्ये शिवसेनेला मजबूत पाठिंबा आहे. देशाची सूत्रे हलविणाऱ्या नागपूर शहरातही शिवसेना कमकुवत असून चालणार नाही. पक्ष बळकट करण्यासाठी बूथस्तरावर पक्ष मजबूत करा.
२०१४ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढूनही शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. तर ७० ठिकाणी पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. मतप्रवाह शिवसेनेच्या बाजूने आहे. तो पारड्यात पाडून घेण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन गजनान किर्तीकर यांनी केले.
मंदिरांच्या संरक्षणासाठी शिवसेना मैदानात उतरणार
न्यायालयाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. वाहतुकीला अडथळा होणारी धार्मिक स्थळे हटली पाहिजे. परंतु रहदारीला अडथळा नसलेली लोकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे हटविण्याचे काम सुरू आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही मंदिर वाचविण्यासाठी अध्यादेश काढला जात नाही. जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा-तेव्हा भाजपाला रामाची आठवण येते. आता त्यांच्याच राजवटीत मंदिरे तोडली जात आहे.
भाजपाने नागपूर शहाराचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी आता शिवसेना मैदानात उतरणार असल्याची घोषणा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माजी खासदार प्रकाश जाधव यांनी यावेळी आपल्या भाषणातून केली. गेल्या चार वर्षाच्या काळात बेरोजगार, शेतकरी, उद्योजक यांच्यासाठी सरकारने काहीच केले नाही असे असूनही कोट्यवधी बेरोजगारांना रोजगार दिल्याचे देशाचे पंतप्रधान खोटे बोलतात, असा आरोप जाधव यांनी केला.