श्री रणवीर गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम : महापौरांनी केले कौतुक
नागपुर: सार्वजनिक गणेशोत्सवातून जनजागृती व्हावी हा उद्देश तांडापेठ येथील श्री रणवीर गणेश उत्सव मंडळाने सार्थ ठरविला. त्यांनी कोव्हिड लसीकरण केंद्राचा देखावा साकारतानाच मनपाच्या सहकार्याने प्रत्यक्ष लसीकरण केंद्र सुरू करीत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण या राष्ट्रीय मोहिमेत सहभाग नोंदविला, हे उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.
त्यांनी शनिवारी (ता. १८) तांडापेठच्या श्री रणवीर गणेश उत्सव मंडळाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे आरोग्य सभापती संजय महाजन, गणेश मंडळाचे पदाधिकारी श्रीकांत ढोलके उपस्थित होते. महापौरांनी श्री रणवीर गणेश उत्सव मंडळाने स्थापना केलेल्या गणेशाचे पूजन केले. मंडळाने साकारलेल्या कोव्हिड लसीकरण केंद्र देखावा आणि प्रत्यक्ष लसीकरण केंद्राची पाहणी केली.
ते म्हणाले, मागील वर्षापासून कोव्हिडने प्रत्येक नागरिक हैराण झाला आहे. यापासून बचावासाठी जानेवारी-२०२१ पासून लसीकरण सुरू करण्यात आले. लसीकरणासाठी नागरिकांना उद्युक्त करणे, हे मोठे आव्हान कालही होते आणि आजही आहे. गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवातून याबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष केंद्र सुरू करणे ही संकल्पनाच समाजसेवेच्या भावनेतून प्रेरीत असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे यापासून आपण मनापासून कौतुक करतो, असेही ते म्हणाले.