नागपूर: कस्तुरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणाच्या सुधारीत आराखड्याला हेरिटेज संवर्धन समितीने तत्वतः मंजुरी प्रदान केली आहे. पुढील कार्यवाहीसाठी नगररचना विभागाकडे नकाशे सादर करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.११) मनपा मुख्यालयातील नगररचना विभागात नीरीचे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली हेरिटेज संवर्धन समितीची बैठक पार पडली.
यावेळी समितीचे सदस्य वास्तुविशारद अशोक मोखा, इतिहास विभागाच्या प्र-पाठक डॉ.शोभा जोहरी, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला चक्रदेव, नगररचना विभागाच्या नागपूर वभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, मनपाचे नगररचनाकार श्री. सोनारे, नागपूर मेट्रोरेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक राजीव येलवटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस, प्रामुख्याने उपस्थित होते.
कस्तुरचंद पार्क येथे जनसुविधा अंतर्गत जॉगिंग, वॉकिंग, सायकल ट्रॅक, वृक्षलागवड, हिरवळ इत्यादी कामे करण्याकरिता मनपाच्या प्रकल्प विभागाद्वारे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मागील बैठकीत समितीला दोन वेगवेगळे प्रस्ताव प्राप्त झाल्याने सुधारीत आराखडे पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश समितीने दिले होते. त्यानुसार प्रकल्प विभागाने सुधारीत आराखडे सादर केले. समितीने सर्व बाबी तपासून आराखड्यांना मंजुरी देत पुढील कार्यवाहीकरिता ते नगररचना विभागाकडे पाठविले आहे.
झिरो माईल परिसरात नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे ‘हेरिटेज वॉक’ तयार करण्याचा प्रस्ताव या बैठकीत आला. त्याला समितीने मंजुरी प्रदान करीत पुढील बैठकीत त्याचे सादरीकरण करावे, असे सूचित केले. झिरो माईल स्तंभाची व परिसराची देखभाल व दुरूस्ती नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने करावी, असे निर्देश समितीने दिले.
सेमिनेरी हिल्स परिसरात सेंटर पॉईंट शाळेने हेरिटेज समितीची परवानगी न घेता बांधकाम केले आहे. याबाबत विवेक सिंग यांनी परिसरातील झाडांची आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार समितीकडे केली. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष डॉ.तपन चक्रवर्ती यांनी डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमण्याचे आदेश दिले. या उपसमितीत अशोक मोखा आणि श्री. पाटणकर हे दोन सदस्य म्हणून काम करतील. ही उपसमिती तपास करून योग्य तो निर्णय घेईल, असे श्री. चक्रवर्ती यांनी सांगितले.
कस्तुरचंद पार्क येथे ३४ दिवस अमर सर्कस चालविण्यासाठी नीरज घाडगे यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. उच्च न्यायालयाने दिलेले कस्तुरचंद पार्कच्या वापराबाबतचे निर्देश लक्षात घेता सदर प्रस्तावाला हेरिटेज संवर्धन समितीने नामंजूर केले.