मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. पात्र अपात्रतेचा निर्णय जनता घेईल. जनतेने म्हटले तर मी घरी बसेल. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व त्याचा अधिकार राहील की नाही? हा प्रश्न आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीत निर्णय द्यायचा असतो.
कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं. प्रत्यक्षात अंमलात आणतो जल्लाद. त्या जल्लादाचे काम लवादाला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने सर्व तयार करून दिले. लवाद म्हणतो मी फाशी कशी देऊ? याचा जन्माचा दाखला नाही. अरे याचा जन्माचा दाखला तपासायला सांगितलं नव्हतं. त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा द्यायला सांगितले होते , अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला.
२०२२ साली जेपी नड्डा आले होते. त्यांना काही अधिकार आहे की नाही माहीत नाही. ते असे म्हणाले होते, या देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप. सर्व पक्ष संपवणार हे भाजपचा अध्यक्ष बोलतो तर लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे काय? खेचा त्यांची शेंडी. शेंडी बोलतो. नड्डा बोललो तर चुकीचा अर्थ घेऊ नका, असा टोला ठाकरेंनी लगावला आहे. ज्या महाराष्ट्रात बाबासाहेब जन्माला आले.
त्याच महाराष्ट्रापासून यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली. याच मातीत ही अवदसा जन्माला आली. हे लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत. त्यांना महाशक्ती साथ देत आहे. महाराष्ट्र अशा गद्दारांना थारा देत नाही. त्यांना संपवून टाकते, या सगळ्या घडामोडी पाहता महापत्रकार परिषद घेणे गरजेचे होते, असे ठाकरे म्हणाले.