नागपूर: अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सिमोरी गाव… गावातील रहिवाशी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकार यांना २२ दिवसांचे बाळ आहे. या बावीस दिवसाच्या बालकाच्या अंगावर त्याच्या आईने घरगुती उपचाराच्या नावाखाली पोटावर चटके देण्याचे अघोरी कृत्य केले. त्यात त्याची प्रकृती गंभीर झाली .ते बाळ वाचेल की नाही याची शक्यता नव्हती मात्र, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने व पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि नागपुरातील नेल्सन रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे २२ दिवसाच्या बाळाला पुनः जीवदान मिळाले.
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अंधश्रद्धेची घटना घडली. अवघ्या बावीस दिवसाचे बाळ हृदयाचा त्रास असल्याने ते सतत रडायचं. सतत रडत असल्यानं त्याच्या आईनं अंधश्रद्धेतून आपले बाळ बरे व्हावे म्हणून चक्क विळा गरम करून त्याच्या पोटावर चटके देत अघोरी कृत्य केले. प्रारंभी त्या बाळावर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती अधिक चिंताजनक झाली असताना या घटनेची माहिती अमरावती व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आली.
त्यांनी या गंभीर घटनेची दखल घेत त्या बाळावर त्वरीत उपचार व्हावेत म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना बाळाला वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याचे आदेश दिले .
त्यानंतर लगेच अमरावती ते नागपूर ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण करण्याचे आदेश दिले आणि २६ फेब्रुवारीला मध्यरात्री बुधवारी रात्री अमरावती शहर आणि अमरावती ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यळाचा वापर करत विशेष रुग्णवाहिकेतून त्या बाळाला नागपूरच्या धंतोली भागातील नेल्सन य खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी अतिदक्षता विभागात दाखल करत डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ सुरु केले. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याच्या ह्रदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्या स्थितीत त्या बाळाला आणले होते .तो वाचेल की नाही अशी स्थिती होती मात्र रुग्णालयाच्या संचालिकाराधा साहू, केंद्र प्रमुख डॉ. सोनालकुमार भगत, वित्त संचालक गणेश खरोडे, डॉ. एस. पी. राजन, डॉ. निलेश दारव्हेकर, डॉ. सचिन कुथे आणि डॉ. कुलकर्णी यांनी त्या बाळावर उपचार केले आणि त्याला जीवदान दिले.