नागपूर: भारतरत्न पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंदजी फुलझेले यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांना माझी विनम्र श्रध्दांजली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली असून ही हानी भरून न निघणारी आहे, अशी भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीचे व्यवस्थापन असो की, नागपूरचे उपमहापौर पद असो, सदानंदजींनी आपल्या कार्यातून सगळ्यांपुढे आदर्श निर्माण केला.
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. समाजातील शोषित-वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत धडपड केली. एक विधायक आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याबद्दल सर्वांच्याच मनात आदर होता. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीसोबतच माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले असल्याची भावनाही गडकरी यांनी व्यक्त केली.
चंद्रशेखर बावनकुळे
दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक सदानंद फुलझेले यांच्या निधन ही अत्यंत दु:खद घटना असून त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावला, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे काम असो की उपमहापौर म्हणून आलेली शहराची जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी अत्यंत कार्यकुशलतेने ती पार पाडली. दीक्षाभूमीवर येणार्या लाखो भाविकांची सर्व प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. यासाठी ते जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करीत होते. दीक्षाभूमीच्या विकासात कुठेही कमतरता राहू नये असाच त्यांचा सतत प्रयत्न असे.
सामाजिक कार्य करतानाच त्यांनी आंबेडकरी चळवळीलाही कुठे मागे पडू दिले नाही. दीक्षाभूमी स्मारकाच्या बांधकामाची जबाबदारी सचिव म्हणून त्यांनी अत्यंत चोखपणे सांभाळली. अशा आंबेडकरी कार्यकर्त्यांचे निधन ही चटका लावणारी घटना ठरते, असेही माजी पालकमंत्री बावनकुळे यांनी म्हणून सदानंदजींना विनम्र श्रध्दांजली अर्पण केली.