नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनास आजपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पात सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा करणार, हे पाहावे लागेल.
अर्थमंत्र्यांना निवडणुका पार पडेपर्यंतच्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होणे कठीण आहे, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पातरोजगार निर्मितीच्या दृष्टीने उत्पादन आधारित सवलत योजनेचा (पीएलआय) सरकारकडून विस्तार केला जाऊ शकतो.तर सामाजिक सुरक्षेच्या योजनांसाठी भरीव तरतूद केली जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षात प्राप्तीकर आणि कंपनी कराच्या वसुलीत समाधानकारक वाढ होण्याची अपेक्षा आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले की, नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी, या संसदेने एक अतिशय सन्मानजनक निर्णय घेतले आहेत. ज्यात नारी शक्ती वंदन कायद्याचा समावेश आहे. तर देशाने कर्तव्य पथावर महिला शक्तीचे सामर्थ्य आणि शौर्य पाहिले आहे. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तर उद्या अर्थमंत्री सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. हा क्षण स्त्री शक्तीच्या पर्वाची सुरुवात असेल. तसेच मला आशा आहे की गेल्या १० वर्षात प्रत्येकाने संसदेत चांगले काम केले. पण काहींनी लोकशाही मूल्यांना फाटा देत गोंधळ घातला.
अशा सर्व खासदारांनी आत्मपरीक्षण करायला हवे की, १० वर्षात त्यांनी काय केले असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला आहे. तसेच, त्यांनी याबाबत आपल्या मतदार संघातील १०० एक लोकांना विचारा. त्यांचे नाव देखील कोणाला माहीत नसेल. पण ज्यांनी सभागृहात चांगल्या विचारांनी काम केले त्यांचे नाव नक्कीच लोकांच्या लक्षात असेल.