नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण विशेष समितीअंतर्गत महिला बचत गट, दिव्यांग आणि गरजू महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यासंदर्भात महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी आढावा घेतला. सोमवारी (ता. २८) मनपा मुख्यालयातील महिला व बालकल्याण समिती कक्षात सभापती दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षेत समाज विकास विभागाची बैठक पार पडली.
यावेळी, समितीच्या उपसभापती अर्चना पाठक, सदस्या उज्वला शर्मा, निरंजन पाटील, रुपाली ठाकूर, सोनाली कडू, प्रणिता शहाणे, स्नेहा निकोसे, मंगला लांजेवार, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर, सहायक अधीक्षक सुरेंद्र सरदारे, उच्च श्रेणी लिपिक शारदा गडकर आदी उपस्थित होते.
बैठकीत महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी दहाही झोन झोनस्तरावर फूड स्टॉल कँटिंग सुरु करणे, नवीन वर्षात गरजू महिलांना शिवणयंत्राचे वाटप, मनपा मुख्यालय परिसरात महिला व बालक यांच्याकरिता फिडींग रूम तयार करणे, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यासारख्या विविध विषयांवर आढावा घेतला.
फूड स्टॉल कॅटरिंगसाठी आतापर्यंत समाजविकास विभागाकडे पाच झोन मधून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. यात धरमपेठ झोन, हनुमाननगर झोन, धंतोली झोन,नेहरूनगर झोन आणि लकडगंज झोनचा समावेश आहे. तसेच पिको फॉल, काचबटन शिवणयंत्र वाटप योजनेअंतर्गत प्रथम टप्यात २१३ लाभार्थ्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. सोबतच शुक्रवारी ९ महिला लाभार्थींचे देयक प्राप्त झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यातील ३० महिला लाभार्थ्यांची यादी मंजुरीकरिता पाठविण्यात आलेली आहे. एकूण २४३ गरजू महिलांना शिवणयंत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर यांनी दिली.
अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५० दिव्यांग लाभार्थ्यांना महापौरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. तसेच पुढील आठवड्यात २५ लाभार्थ्यांना त्यानंतर आणखी २५ दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालेल्या १० दिव्यांगांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचे धनादेश देण्यात आलेले आहेत, अशी माहितीसुद्धा दिनकर उमरेडकर यांनी यावेळी दिली.