नागपूर: सीताबर्डी येथील मनपाद्वारे संचालित बुटी दवाखान्याचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याजागी मोठे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल प्रस्तावित आहे. नवे हॉस्पीटल उभारण्यासाठी महानगरपालिका नवा प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिली.
बुधवारी (ता.११) संजय बंगाले यांनी बुटी दवाखान्याची पाहणी केली. त्याप्रसंगी त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, श्रीमती कामदार, बुटी परिवारातील गोपाळ बुटी, पद्माकर भेलकर, अरूण मेंढी प्रामुख्याने उपस्थित होते.
१९०६ साली मुकुंद बुटी यांनी बुटी दवाखान्याची जागा नागपूर महानगरपालिकेला सोपविली होती. आता ती इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने त्या जागी मोठे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज हॉस्पीटल तयार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने शहरातील दवाखाने अत्याधुनिक करणार आहे. याअंतर्गत बुटी दवाखाना अत्याधुनिक करण्यात येणार असल्याची माहिती सभापती संजय बंगाले यांनी दिली.
बर्डीचा परिसर हा वर्दळीचा असल्याने त्या ठिकाणी अत्याधुनिक दवाखाना असणे गरजेचे आहे. दवाखान्यालगत असलेल्या जागेत पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून रस्त्यावरील रहदारी कमी होईल, असेही श्री. बंगाले यांनी सांगितले.
प्रारंभी संजय बंगाले यांनी दवाखान्याची पाहणी केली व तेथील परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. तेथे कर्मचारी वर्ग कमी असल्याने कॉटन मार्केट येथील दवाखान्याचे कर्मचारी येथे स्थानांतरीत करण्यात यावे, असे आदेश श्री. बंगाले यांनी दिले. दवाखान्यात प्रथमोचार होतो की नाही याची माहिती त्यांनी घेतली.