चिखलदरा /नागपूर: केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाकडून देशातील 4041 शहरी व अर्ध शहरी क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये प्रत्येक नागरिकांचा स्वच्छते बाबत लोकसहभाग वाढवण्याचे उद्देशाने केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत क्षेत्रीय प्रचार निदेशालय महाराष्ट्र व गोवा विभाग आणि नगर परिषद चिखलदरा यांच्या सहकार्याने दि 28 फेब्रुवारी 2018 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषद विश्राम गृहाच्या प्रांगणात विशेष जनसंवाद आणि माहिती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमास अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष विजया सोमवंशी, उपनगराध्यक्ष शेख अब्दूल शेख हैदर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, क्षेत्रीय प्रचार निदेशालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनोने, उपविभागीय अधिकारी डॉ विजय राठोड, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी जी एन वाहूरवाघ, मुख्याधिकारी प्रशांत रोडे, भारतीय टपाल विभागाचे वरिष्ठ अधिक्षक एम बी लाखोरकर, समाजशात्रज्ञ निलेश नागपूरकर, अग्रणी जिल्हा अधिकारी जितेन्द्रकुमार झा आणि नगरपरिषदचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
या मेळाव्यादरम्यान ‘स्वच्छ भारत अभियान – स्वच्छ सर्वेक्षण 2018 ‘ या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन, विदयार्थ्यांची प्रचार रॅली, प्रश्नमंजुषा स्पर्धा, माहिती चित्रपट, आरोग्य तपासणी, बँक मेळावा, बाल विकास सेवा योजना, महावितरण आणि भारतीय डाक विभाग इत्यादी विभागा मार्फत राबविल्या जाणा-या योजनांची माहिती या उपक्रमांचा समावेश राहणार आहे. यावेळी मुद्रा योजना व सौभाग्य योजनेतील लाभार्थ्यांना कर्जाचे मंजूरी आदेश व पुरस्कारही वितरीत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या पुर्व प्रसिध्द्दी करिता दिनांक 26 ते 27 फेब्रुवारी 2018 रोजी सर्व विदयालय व महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, गावातील किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, आणि दररोज संध्याकाळी मुख्य बाजार पेठेत कलापथकाद्वारे प्रबोधनपर गीत व नाटक, माहिती चित्रपट इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.