वर्धा: महाविकास आघाडीतर्फे वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्या प्रचारार्थ २ एप्रिल रोजी निघणाऱ्या रॅलीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत.
नामांकन पत्र दाखल करण्यासाठी काळे यांनी हा दिवस निश्चित केला आहे. या दिवशी काळे यांच्या आई अनुराधाताई शरद काळे यांचा स्मृतिदिन आहे. आईच्या स्मृतीस अभिवादन करीत आपण निवडणूक कार्यास आरंभ करणार असल्याचे ते म्हणत आहे. मात्र या रॅलीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे पण उपस्थित राहून काळे यांना आशीर्वाद देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले.
पक्षनेते अतुल वांदिले तसेच इंडिया आघाडीचे निमंत्रक अविनाश काकडे यांनी पवार यांची हजेरी निश्चित असल्याचे सांगितले.तसेच माजी मंत्री अनिल देशमुख पण उपस्थित राहणार आहे.
अमर काळे हे केवळ एका पक्षाचे उमेदवार नसून ते इंडिया उमेदवार आहेत. हुकूमशाही वृत्ती हाणून पाडणे व लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी समविचारी लोकं एकत्र आले आहेत.
त्यांची सभा रविवारी सायंकाळी संपन्न झाली, असे काकडे यांनी नमूद केले.त्यात अमर काळे, अनिल देशमुख, प्रा.सुरेश देशमुख, शेखर शेंडे, हर्षवर्धन देशमुख, सुधीर कोठारी, अतुल वांदिले, मनोज चांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.